गोव्यातील त्या पाच पालिका निवडणुकांच्या प्रभाग आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Supreme Court is hearing the ward reservation of five municipal elections in Goa
Supreme Court is hearing the ward reservation of five municipal elections in Goa

पणजी :  राज्यातील त्या पाच पालिका निवडणुकांसाठीच्या प्रभाग आरक्षण रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी आज सुरू झाली आहे. म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे व सांगे या पाच पालिकांच्या प्रभाग आरक्षणासंदर्भातचे भवितव्य काल सर्वोच्च न्यायालयात ठरण्याची शक्यता आहे. सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना या निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरही मूळ याचिका दारांना त्यांची समस्या मांडण्याची संधी उपलब्ध आहे, अशी बाजू मांडली.

मडगाव, मुरगाव, केपे, सांगे व म्हापसा या पाच पालिकांसाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी काल झाली. या छाननीअंती 93 प्रभागांसाठी 438 उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले तर 6 जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननीवेळी केपे पालिकेतील प्रभाग क्रमांक 7 मधील जोझ कार्दोझ व डेव्हिड फर्नांडिस यांचे तर मुरगाव पालिकेतील प्रभाग क्रमांक 11 मधील सैफुला बशीर खान व प्रतिम अशोक शेट्ये यांचे तर प्रभाग क्रमांक 18 मधील सैफुला बशीर खान व हुसेनसाब नबिसाब शेख यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. 25 प्रभाग असलेल्या मडगाव व मुरगाव पालिकांमध्ये शंभराहून अधिक उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले आहेत. त्यामुळे या पालिकेसाठी चुरशीची निवडणूक होणार आहे अशी चिन्हे दिसत आहेत. म्हापसा पालिकेसाठी 116 उमेदवारी अर्जांपैकी 97, मडगाव पालिकेसाठी 128 पैकी 111, केपे पालिकेसाठी 73 पैकी 54, सांगे पालिकेसाठी 46 पैकी 43 तर मुरगाव पालिकेसाठी 155 पैकी 133 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहे.

उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने त्यानंतरच या पालिकांमधील उमेदवारांचा प्रचाराला वेग येणार आहे. काही प्रभागामध्ये मतविभागणी होण्याची शक्यता आहे अशा उमेदवारांना मागे घेण्यासाठी काही उमेदवारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वीच पेडणे, डिचोली, वाळपई, कुडचडे, कुंकळ्ळी व काणकोण या सहा पालिकांसाठीच्या 75 प्रभागांसाठी 429 उमेदवारांमध्ये चुरस होणार आहे. निवडणूक असलेल्या पालिकांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणाही गतिमान झाली आहे. रात्री उशिरापर्यंत मद्यालये खुली ठेवण्यात परवाने नसलेल्यांविरुद्ध तसेच या मद्यालयांच्या विक्रीचा हिशोब निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या खर्च देखरेख निरीक्षकांकडून घेणे सुरू झाले आहे. पालिका निवडणुकीसाठी उमेदवाराला दोन लाखांचा खर्च करण्याची मर्यादा आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष समर्थक असलेल्या पॅनल तसेच उमेदवारांनी घरोघरी चालत जात प्रचार सुरू केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com