रेल्वेतील अडथळ्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

रेल्वे अभियंत्यांची परिषद
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे रेल्वे अभियंत्यांना आवाहन

आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान परिषदेचा शुभारंभ करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, बाजूस विश्‍वेश चौबे, अजयकुमार सिंग, सुधीर मित्तल. आर. सी. ठाकूर, ए. के. खंडेलवाल आणि विजय अगरवाल.

पणजी : रेल्वे वाहतुकीतील वारंवार होणाऱ्या दुरुस्त्यांचा लोकांना फटका बसतो. जर घरांची अशाप्रकारे वारंवार दुरुस्ती केली, तर गृहिणी आपणास काय म्हणेल, याचा विचार अभियंत्यांनी केला पाहिजे.

घराची कायमची दुरुस्ती ज्याप्रमाणे केली जाते, त्याप्रमाणे रेल्वे वाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधले पाहिजेत. इतरांचे कुटुंब सुखी राहील आणि समाजातील शेवटचा घटक कसा सुखी राहील हा विचारही त्यांनी करावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी देश-विदेशातून आलेल्या रेल्वे अभियंत्यांना केले.

बांबोळी येथील तारांकित हॉटेलमध्ये आजपासून दक्षिण पश्‍चिम रेल्वेच्यावतीने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अभियांत्रिकी सदस्य विश्‍वेश चौबे, दक्षिण पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अजयकुमार सिंग, कायमस्वरूपी अभियंत्यांची संस्थेचे (आयपीडब्ल्यूई) कार्यकारी संचालक सुधीर मित्तल. आर. सी. ठाकूर, ए. के. खंडेलवाल आणि दक्षिण पश्‍चिम रेल्वेचे प्रधान मुख्य अभियंता विजय अगरवाल यांची उपस्थिती होती.
मंत्री अंगडी म्हणाले की, देशात ५० टक्के लोक अजूनही रेल्वेने प्रवास करीत नाहीत.

देशातील ५० ठिकाणे पर्यटनाच्यादृष्टीने निवडण्यात आली आहेत आणि त्या ठिकाणी रेल्वेद्वारे पोहोचता येईल, अशी सरकारची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश विकासाचे कार्य हाती घेतले आहे आणि त्यात रेल्वेसेवेचा महत्त्वाचा सहभाग आहे. अभियंत्यांनी रेल्वेची सेवा सुरळीत कशी राहील, याविषयी विचार केला पाहिजे. लोकांना अधिकाधिक चांगल्यारितीने कशा सुविधा पुरविल्या जातील, अशापद्धतीने योजना आखल्या पाहिजेत. ज्यापद्धतीने विख्यात अभियंते विश्‍वेश्‍वरय्या यांनी धरणांची निर्मिती केली. त्यानंतर अब्दुल कलाम यांचे उदाहरण घ्या. या लोकांनी समाजाचा विचार अगोदर केला. आपले भविष्य काय राहील, विकास कशापद्धतीचा असावा याकडे अभियंत्यांनी पाहिले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, मेक इन इंडिया या पंतप्रधान मोदी यांनी राबविलेल्या योजनेला अभियंत्यांनी पुढे नेले पाहिजे. रेल्वेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा देशात बनल्या पाहिजेत, रेल्वसाठी लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठाही देशातूनच झाला पाहिजे, यातून रेल्वेसेवा ही मोठा ग्राहक असेल हे ध्यानात घ्यावे. त्याचबरोबर कोणत्याही अडचणींना किंवा अडथळ्यांवर तात्पुरते उपाय शोधू नका, तर ते दीर्घकाळासाठी उपयोगी पडू शकतात, असे उपाय शोधावेत. रेल्वे सेवेसाठी जर विविध वस्तूंचे उत्पादन सुरू केले, तर ते गावापासून राज्यापर्यंत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या वस्तू आयात कराव्या लागणार नाहीत आणि देशातील पैसा परदेशातही जाणार नाही.

याप्रसंगी परिषदेच्यानिमित्ताने माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. विश्‍वेश चौबे आणि अजयकुमार सिंग यांची याप्रसंगी भाषणे झाली. याप्रसंगी के. सी. सूद आणि व्हीसीए पद्मनाभन पुरस्कारांचे वितरण मंत्री अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले.
हे पाहा : केंद्राकडून गोव्याला कवडीमोल किंमत!

संबंधित बातम्या