देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं माहितीय? अखिलेश यादवांचा पंतप्रधान मोदींना टोला

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

शेतकरी आंदोलनावरून समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

शेतकरी आंदोलनावरून समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आज संसदेत अखिलेश यादव यांनी नवीन कृषी धोरणाबाबत बोलताना, काल पंत्रप्रधानांनी भाषणात एमएसपी होती, एमएसपी आहे आणि एमएसपी राहणार असल्याचे म्हटले, मात्र हे फक्त भाषणातच असून वास्तविक जमिनीवर एमएसपी नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय शेतीमालावर शेतकऱ्यांना एमएसपी मिळत नसल्याचे म्हणत, जर एमएसपी मिळत असते तर ते दिल्लीच्या सीमेरेषेवर आंदोलन करत बसले नसते, असे अखिलेश यादव यांनी यावेळेस म्हटले आहे. 

राज्यसभेत भावुक झालेल्या पंतप्रधानांच्या भाषणाने बॉलिवूड अभिनेता प्रभावित

तसेच, नवीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी देशातील अन्य शेतकऱ्यांना जागे केले असून, या शेतकरी आंदोलनकर्त्यांचे आपण अभिनंदन करत असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. त्यानंतर सरकारने नवीन कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केले असल्याचे म्हटले आहे तर, शेतकऱ्यांनी हे कायदे स्वीकारले नसल्यामुळे सरकार हे कायदे मागे का घेत नसल्याचा सवाल अखिलेश यादव यांनी यावेळेस विचारला. ज्यांच्यासाठी म्हणून हे सुधारित कायदे करण्यात आले आहेत, त्यांनाच हे विधेयक नको असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. 

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून सरकारवर निशाणा साधताना अखिलेश यादव यांनी, आंदोलनातूनच राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलनातूनच असंख्य हक्क मिळाल आहेत, महिलांना देखील मतदानाचा हक्क आंदोलनातूनच मिळाला आहे. इतकेच नाही तर, महात्मा गांधी हे महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले कारण त्यांनी आफ्रिकेत, जगभरात आणि देशात केलेल्या आंदोलनामुळेच, असे अखिलेश यादव यांनी आपल्या भाषणात नमूद केले. 

याव्यतिरिक्त, नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून अखिलेश यादव यांनी भारतीय जनता पक्षावर नाव न घेता टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराचे भाषण करताना, देशात आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटले होते. त्यावर अखिलेश यादव यांनी देणग्या गोळा करण्यासाठी बाहेर गेलेल्यांना काय म्हणावे असा खोचक सवाल विचारला. तसेच असे देणगीजीवी संघटनेचे सदस्य नाहीत का म्हणत, अखिलेश यादव यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चेत उत्तर देताना विरोधकांवर निशाणा साधला होता. देशात आंदोलनकर्त्यांचा नवीन गट जन्माला आला असून, तो निषेधाशिवाय जगू शकत नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. याशिवाय काही राजकीय पक्ष संसदेत कृषी कायद्यास विरोध करीत आहेत, तर त्यांच्या राज्यात त्यांनी या कायद्यातील काही तरतुदी लागू केल्या असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते.          

संबंधित बातम्या