भाजपच्या मुख्यमंत्र्याचा शाही थाट; रशियावरुन मागवलं हेलिकॉप्टर

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 एप्रिल 2021

रशियावरुन मागवलेलं हेलिकॉप्टर भाडेतत्वावर घेण्य़ात आले असून तासाचं भाड 5 लाख 10 हजार रुपये असणार आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाचा हाहाकार माजला असताना मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांना पुढील महिन्यापासून नवीन हेलिकॉप्टर मिळणार आहे. हिमाचल प्रदेश सरकारला या नवीन हेलिकॉप्टरचा पुढील महिन्यात ताबा मिळणार आहे. रशियावरुन हे नवीन हेलिकॉप्टर दिल्लीत दाखल झालं असून त्याच्या चाचण्या सुरु आहेत. डीसीसीएने  परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांना हे हेलिकॉप्टर वापरता येणार आहे. विशेष म्हणजे रशियावरुन मागवलेलं हे हेलिकॉप्टर भाडेतत्वावर घेण्य़ात आले असून तासाचं भाड 5 लाख 10 हजार रुपये असणार आहे. त्यामुळे आता हिमाचल प्रदेश कॉंग्रेसने जयराम ठाकुर सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. (BJPs Chief Minister Shahi That Helicopter ordered from Russia)

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारं हेलिकॉप्टर हे सध्या सरकारने भाडेतत्वावर घेतलेल्या हेलिकॉप्टरपैकी एक आहे. सध्या तासभरासाठी जरी हे हेलिकॉप्टर वापरल्यास सरकारी तिजोरीतून दोन लाख खर्च होतात. स्काय वन कंपनीच्या या एमआय 171 ए 2 प्रकारच्या हेलिकॉप्टरची आसन क्षमता 24 एवढी आहे. सध्या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर वापरत असलेले हेलिकॉप्टरमध्ये जास्तीत जास्त सहाच व्यक्ती बसू शकतात. नवीन हेलिकॉप्टरमध्ये जास्त आसन क्षमता असल्या कारणानेच जास्त भाडं आकारण्यात आलं आहे. यासंदर्भात कॉंग्रेसचे हिमाचल प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष कुलदीप सिंह राठोड यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारवर कर्जाचा एवढा मोठा डोंगर असताना  दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री आरामदायक हेलिकॉप्टर आणि इतर खर्च करण्यात मशगुल आहेत. सरकारच्या अशा वायफळ खर्चामुळे हिमाचल प्रेदश सरकारची परिस्थिती बिकट होत चालल्याचा टोला कुलदीप सिंग राठोड यांनी लगावला आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय: 18 वर्षावरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

नवीन हेलिकॉप्टर हे पाच वर्षाच्या करार तत्वावर घेण्यात आले आहे. ठाकुर सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने कंपनीसोबत या संदर्भातील करार केला आहे. याआगोदर पवन हंस या कंपनीचे हेलिकॉप्टर भाडेतत्त्वार घेतले होते. मात्र तो करार नुकताच संपुष्टात आला आहे. डीसीसीएडून या हेलिकॉप्टरच्या वापरण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर हे हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्यांच्या सवेत रुजू होईल. मुख्यमंत्री हे हेलिकॉप्टर त्यांच्या दौऱ्यासाठी वापरतील. त्याचबरोबर बर्फाळ प्रदेशातील लोकांपर्यंत हिवाळ्यामध्ये सेवा पोहचवण्यासाठीही या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येईल. तसेच या हेलिकॉप्टरचा वापर नैसर्गिक आपत्तीच्या काळातही केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

संबंधित बातम्या