'पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता फार काळ शासन करू शकत नाही'; काँग्रेसकडून शेतकरी आंदोलनाचे समर्थन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 4 जानेवारी 2021

शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये उद्या (ता. ४)  होणाऱ्या चर्चेआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी, लोकशाहीत जनभावनेची उपेक्षा करणारे सरकार आणि नेता फार काळ शासन करू शकत नाही, असा केंद्रावर प्रहार करून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाचे समर्थन केले. 

नवी दिल्ली :  शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये उद्या (ता. ४)  होणाऱ्या चर्चेआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी, लोकशाहीत जनभावनेची उपेक्षा करणारे सरकार आणि नेता फार काळ शासन करू शकत नाही, असा केंद्रावर प्रहार करून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाचे समर्थन केले. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाचा आज ३९ वा दिवस होता. आतापर्यंत आंदोलनामध्ये ५० हून अधिक शेतकऱ्यांनी प्राण गमावला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी निवेदन जारी करून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच, ‘स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासात पहिले असे अहंकारी सरकार सत्तेत आहे, ज्याला जनता तर दूर पण अन्नदात्याचा त्रासही दिसत नाही. मुठभर उद्योगपती आणि त्यांच्या फायद्याची हमी हाच सरकारचा मुख्य कार्यक्रम आहे,’ असा टोला लगावला. 

सोनिया गांधींनी म्हटले आहे, की थंडी आणि भर पावसात संघर्ष करणाऱ्या अन्नदात्याची परिस्थिती पाहून सर्व देशवासियांप्रमाणेच आपलेही मत व्यथित आहे. या आंदोलनाबद्दल सरकारच्या उदासीनतेमुळे आतापर्यंत ५० हून अधिक जणांचा जीव गेला असून काहींनी तर सरकारच्या उपेक्षेमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. परंतु निर्दयी मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेला नाही. तसेच पंतप्रधान किंवा मंत्र्यांकडून सांत्वनाचा एक शब्दही आलेला नाही. लोकशाहीत जनभावनेची उपेक्षा करणारे सरकार आणि नेता दीर्घकाळ शासन करू शकत नाही, असा इशारा देत सोनिया गांधींनी थकवा आणि पळवा या सरकारच्या धोरणापुढे धरतीपुत्र शेतकरी, मजूर गुडघे टेकणार नाही. अजूनही वेळ गेलेली नसून मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडून तिन्ही काळे कायदे मागे घ्यावे आणि थंडी-पावसात प्राण गमावणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन समाप्त करावे,  हाच राजधर्म आहे अशी आठवणही सरकारला करून दिली आहे.

 

अधिक वाचा :

काश्मीर खोऱ्याने पांघरली मखमली बर्फाची चादर.. 

आंदोलक शेतकऱ्यांना पावसाचा त्रास ; आज पुन्हा सरकारबरोबर चर्चा करणार 

संबंधित बातम्या