दिल्लीत अर्धसैनिक दलाच्या अतिरिक्त कंपन्या तैनातीचा निर्णय; बॅरिकेट्सच्या धडकेत एका शेतकऱ्याचा मृत्यू (व्हिडिओ) 

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे नियोजन केले होते. मात्र काही ठिकाणी या रॅलीला हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकर्‍यांचे तीव्र आंदोलन आणि दिल्लीतील परिस्थितीसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.

प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे नियोजन केले होते. मात्र काही ठिकाणी या रॅलीला हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकर्‍यांचे तीव्र आंदोलन आणि दिल्लीतील परिस्थितीसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीस गृहसचिव, दिल्ली पोलिस अधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. व या बैठकीत अर्धसैनिक दलाच्या अतिरिक्त कंपन्या दिल्लीत तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवीन कृषी विधेयकातील तीन कायद्यांच्या विरोधात शेतकरी मागील दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढली होती. परंतु यावेळेस हिंसक घटना घडून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. व त्यानंतर गृहमंत्रालयाने उच्चस्तरीय बैठक घेत दिल्लीत अर्धसैनिक दलाची अजून कुमक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दिल्लीत 1500 पेक्षा जास्त अर्धसैनिक दल दाखल होणार आहे. 

''ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान घडलेल्या हिंसक घटनेशी आमचा संबंध नाही...

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी व पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळेस पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र तरीदेखील आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना चकवा देत, काश्मिरी गेटमार्गे लाल किल्ला आणि आयटीओ गाठले. या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या काही जणांनी पोलिसांवर दगडफेक, तर काही जणांनी पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. याशिवाय लाल किल्ल्यात शिरून दोन झेंडे फडकावले. 

दरम्यान, पोलीस आणि आंदोलकर्ते यांच्यात झालेला धुमश्चक्रीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. आयटीओ परिसरात पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सवर ट्रॅक्टर धडकवल्यानंतर ही घटना घडल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. ट्रॅक्टरने बॅरिकेट्सला जोरदार धडक दिल्यानंतर हा ट्रॅक्टर पलटी झाला होता. व यातच या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे, शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्लीचे सहआयुक्त पोलिस अधिकारी आलोक कुमार यांनी याबाबत बोलताना आंदोलनाच्या वेळेस पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.   

संबंधित बातम्या