काल केलेल्या शक्तीप्रदर्शनानंतर आंदोलक शेतकरी आज पुन्हा केंद्र सरकारशी चर्चा करणार..

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

कृषी कायद्यांबाबत सरकारशी आज होणाऱ्या वाटाघाटींआधी प्रजासत्ताक दिनी नियोजन केलेल्या किसान संचलनाच्या निमित्ताने रंगीत तालीम म्हणून शेतकरी संघटनांनी काल दिल्लीच्या सीमेवर जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

नवी दिल्ली :  कृषी कायद्यांबाबत सरकारशी आज होणाऱ्या वाटाघाटींआधी प्रजासत्ताक दिनी नियोजन केलेल्या किसान संचलनाच्या निमित्ताने रंगीत तालीम म्हणून शेतकरी संघटनांनी काल दिल्लीच्या सीमेवर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या संचलनामध्ये पाच हजारांहून अधिक ट्रॅक्टर आणि इतर वाहने सहभागी झाली होती, असे संयुक्त किसान संघर्ष समन्वय मोर्चातर्फे सांगण्यात आले.

दिल्ली सीमेवर कुंडली- मानेसर – पलवल बायपास , कुंडली - गाजियाबाद- पलवल बायपास मार्गावर ही वाहन फेरी काढण्यात आली होती. यामध्ये शेतकरी संघटनांच्या आंदोलकांसोबतच जवळपासच्या गावांमधील शेतकरी, कामगार संघटना आणि सामाजिक संघटनांचाही भाग घेऊन एकजुटीचे प्रदर्शन केले. संयुक्त किसान संघर्ष समन्वय समितीच्या दाव्यानुसार पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशसह राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड या राज्यांमध्ये या वेगळ्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. पंजाब आणि हरियानाच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर फेऱ्या काढण्यात आल्या होत्या.

तर उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्येही या फेऱ्या काढून स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. नर्मदेच्या खोऱ्यातील शेतकरी आणि मजुरांचे पथक दिल्लीच्या सीमेवर आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी निघाल्याचेही सांगण्यात आले. शेतकरी संघटनांनी कृषी कायदे रद्द करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची, तत्पूर्वी १३ जानेवारीला कृषी कायद्यांची होळी करण्याची घोषणाही शेतकरी संघटनांनी केली.

तक्रारींचा आढावा घेणार

विघातक प्रवृत्तींकडून शेतकरी आंदोलनाला बदमान करण्याच्या प्रयत्नांबद्दल समन्वय समितीचे प्रतिनिधी डॉ. दर्शन पाल यांनी नाराजी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करताना संयुक्त किसान संघर्ष मोर्चाची शिस्तपालन समिती याबाबतच्या तक्रारींचा आढावा घेऊन कारवाई करेल, असेही स्पष्ट केले.

आणखी वाचा :

कोरोना लसीकरणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा..देशभरात ड्राय रन पार पडणार

संबंधित बातम्या