सिंधू करारावर चर्चा करण्यासाठी भारत-पाकिस्तान आमनेसामने; वाचा सविस्तर

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 मार्च 2021

भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी मंगळवारी दोन्ही देशांमध्ये सिंधू जल करारावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी मंगळवारी दोन्ही देशांमध्ये सिंधू जल करारावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा येथे 2019 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध खूपच बिघडले होते. त्यानंतर आज तब्बल अडीच वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे एक पथक भारतात आले. 23 आणि 24 मार्च या दोन दिवसाच्या कालावधीत ही बैठक होणार आहे. या बैठकीमुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी पुन्हा एक नाव मार्ग खुला झाला आहे, असे मत भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. (India-Pakistan meet to discuss Indus Water Treaty)

पुलवामा हल्ल्याच्या बदल्यात बालाकोट एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशाचे अधिकारी या बैठकीनिमित्त पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. त्याचबरोबर . शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) अंतरंगात पाकिस्तानच्या पाब्बी भागात दहशतवादविरोधी युद्धसराव होणार असून, भारतीय सैन्यदेखील या युद्धसरावात सहभागी होण्याची शक्यता आहे. परंतु याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी भारत या अभ्यासातून मागे हटणार नसल्याचे समजते. कारण एससीओ हा रशियासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान विभाजनानंतर इतिहासात प्रथमच भारतीय सैन्य पाकिस्तानातील मैत्रीपूर्ण युद्ध सरावात सहभागी होऊ शकते. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तानला चर्चेच्या मार्गावर आणण्यासाठी युएई आणि सौदी अरेबियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

उद्यापासून ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले; बागेत 64 प्रजातीचे 15 लाख फुले

याशिवाय, येत्या 30 मार्च रोजी ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे हार्ट एशिया परिषद होणार आहे. यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी सहभागी होणार आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी तीन गोष्टी ठरल्या महत्वाच्या 

1. 25 फेब्रुवारीनंतर युद्धबंदीचे उल्लंघन नाही -
मागील महिन्याच्या 25 फेब्रुवारीला हॉटलाईनवर दोन्ही देशांच्या सैन्य ऑपरेशनचे महानिर्देशक यांची चर्चा झाली. यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धबंदीच्या नियमाचे उल्लंघन केले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांच्या तोफा थंडावल्या. मात्र 1 ते 25 फेब्रुवारी मध्ये 225 वेळा तर, जानेवारी महिन्यात 336 वेळा पाकिस्तानने युद्धबंदी नियमाचे उल्लंघन केले आहे. 

2. दोन्ही देशांकडून चिथावणीखोर वक्तव्ये नाहीत -
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी मागील काही दिवसांपासून सामंजस्याची भूमिका घेत कोणतीही चिथावणीखोर वक्तव्ये केलेली नाहीत. त्याचबरोबर इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इमरान खान यांना पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा दिल्या - 
मंगळवारी दिल्ली येथील पाक उच्चायोग येथे पाकिस्तान दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पाकिस्तानचे समपदस्थ इम्रान खान यांचे  अभिनंदन केले. 

अरब देशांच्या लवादाने 3 गोष्टींवर सहमती दर्शविली

1. दोन्ही देशांचे नेते कोणतीही कठोर विधाने करणार नाहीत. पाकिस्तान नवीन संबंध प्रस्थापित करेल आणि भारत स्वीकारेल.
2. भारतात सीएएच्या निषेधासंबंधित आंदोलनासाठी पाकिस्तानकडून निधी मिळाल्याचा पुरावा मिळाल्यास भारत शांतता चर्चा थांबवेल. 
3. बलुचिस्तानच्या मुद्यावर भारत कोणत्याही टप्प्यावर आवाज उठवणार नाही.

दरम्यान, (India-Pakistan meet to discuss Indus Water Treaty) या सर्व घडामोडींवर तज्ज्ञांनी आपली भूमिका  व्यक्त केली आहे. पाकिस्थानी सैन्याने दहशतवादावर आळा घातल्यास शांतता शक्य आहे, असे मत माजी सेना प्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांनी म्हटले आहे. ''भारत-पाक संबंधांमध्ये काही सकारात्मक घटना घडत आहेत. मात्र आता पाकिस्तानचे नेतृत्व आणि त्याहूनही अधिक, पाकिस्तानी लष्कराच्या हेतूची परीक्षा होणार आहे. आम्ही भूतकाळातील अनुभवावरून अनेक गोष्टी शिकलो आहोत. पाकिस्तान तातडीने दबावातून काही प्रमाणात कारवाई करतो, परंतु दहशतवादाला त्याच्या सरकारच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग बनवण्याच्या सैन्याचा मोह अजूनही कायम आहे. यामुळे संबंध बिघडतात,'' असे मलिक यांनी सांगितले आहे. तथापि, भारतीय सैन्याने पाकिस्तानात युद्धसराव केल्यास ती एक ऐतिहासिक घटना ठरणार असल्याचे देखील व्ही.पी. मलिक यांनी अधोरेखित केले आहे. याशिवाय भविष्यात पाकिस्तानी लष्कराला तेथील दहशतवादी गट आणि आयएसआयच्या कारवायांवर कडक कारवाई केल्यानेच दोन्ही देशांमध्ये शांतता शक्य असल्याचे मलिक यांनी नमूद केले आहे.

संबंधित बातम्या