'आकाश' क्षेपणास्त्राच्या पुढील आवृत्तीची यशस्वी चाचणी  

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने आज सोमवारी ओदिशाच्या परीक्षण तळावरुन बंगालच्या उपसागरात आकाश-एनजी क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले.

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने आज सोमवारी ओदिशाच्या परीक्षण तळावरुन बंगालच्या उपसागरात आकाश-एनजी क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. डीआरडीओने एकात्मिक चाचणी रेंजमधून आकाश या क्षेपणास्त्राच्या पुढच्या आवृत्तीची चाचणी घेतली. आकाश-एनजी हे नवीन पिढीचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्रा हवाई धोका कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय वायू सेनेसाठी बनवण्यात आले आहे. 

जिन्नांची निशाणी इम्रान सरकार ठेवणार गहाण ?

डीआरडीओने आज केलेल्या आकाश-एनजी चाचणीत क्षेपणास्त्राने अचूकतेसह लक्ष्य गाठले. आकाशच्या पुढील आवृत्तीचे प्रक्षेपण केल्यानंतर या क्षेपणास्त्राने सर्व चाचण्या उद्दीष्टांची पूर्तता केली असल्याचे माहिती डीआरडीओने दिली आहे. आकाश या क्षेपणास्त्राची पहिली आवृत्ती यापूर्वीच भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आली होती. व चीन सोबत वाढलेल्या तणावानंतर भारताने आकाश ही प्रणाली लडाख परिसरात  कार्यरत केलेली आहे. आकाश हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. याचा वेग 4000 किमी प्रतितास इतका आहे. एकावेळी तब्बल 60 किलो स्फोटके वाहून नेण्याची या मिसाईलची क्षमता आहे. आकाश क्षेपणास्त्र हे 30 किलोमीटरच्या परिघात आणि 19 किलोमीटर उंचीवरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते.    

दरम्यान, भारत आणि चीन यांच्या सीमेवरील पूर्व लडाख मध्ये चीनने केलेली सैन्याची जमवाजमव आणि क्षेपणास्त्र तैनातीच्या पार्श्वभूमीवर भारताने नव्या पिढीच्या क्षेपणास्त्र विकासाच्या आणि तैनातीच्या कार्यक्रमाला अधिक गती दिली आहे. आणि  त्यामुळेच डीआरडीओकडून सतत क्षेपणास्त्र चाचण्या सुरु आहेत.

संबंधित बातम्या