भारतीय सुरक्षा दलाने उधळला दहशतवाद्यांचा डाव

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

सुरक्षा दलाने आज मोठी कारवाई करत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मूहून श्रीनगरकडे शस्त्रे आणि स्फोटके घेऊन जाणारा ट्रक पहाटे ४.२० च्या सुमारास नगरोटा टोल नाक्यावर सुरक्षा दलाच्या जवानांनी अडविला.

जम्मू : सुरक्षा दलाने आज मोठी कारवाई करत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मूहून श्रीनगरकडे शस्त्रे आणि स्फोटके घेऊन जाणारा ट्रक पहाटे ४.२० च्या सुमारास नगरोटा टोल नाक्यावर सुरक्षा दलाच्या जवानांनी अडविला. या वेळी ट्रकमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात चार दहशतवादी मारले गेले. तर, काश्‍मीर पोलिस दलाचे दोन जवान जखमी झाले. हे दहशतवादी जैशे महंमदचे असल्याचा संशय लष्कराने व्यक्त केला आहे.

ट्रकमध्ये तांदळाची पोती होती आणि त्यात दहशतवादी लपून बसले होते. दहशतवाद्यांबाबत गुप्तचरांकडून माहिती मिळाली असल्याने सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्‍मीर पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या संयुक्त पथकांनी हा ट्रक टोल नाक्यावर अडविला. ट्रकची झाडाझडती सुरू असताना वाहनचालक पळून गेला. जवानांनी ट्रकची कसून तपासणी सुरु केली असता लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी तातडीने प्रतिहल्ला करत चारही दहशतवाद्यांना ठार मारले. 

घटनास्थळाहून ११ एके रायफल्स, तीन पिस्तुल, २९ ग्रेनेड, सहा यूबीजीएल ग्रेनेड, मोबाईल फोन आदी स्फोटके आणि साहित्य जप्त केले. चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने ग्रेनेड फेकले. यात दोन पोलिस जवान जखमी झाले. मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून ते मोठा घातपात घडवून आणण्याची तयारी करत होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेषत: जम्मू आणि काश्‍मीरची निवडणूक प्रक्रिया हाणून पाडण्याचा त्यांचा डाव होता. मृत दहशतवादी जैशे महंमद संघटनेशी निगडीत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 
जखमी जवानात अखनूरचे कुलदिप राज आणि बनिहालचे नील कासिम, रामबनचे मोहंमद इसाक मलिक यांचा समावेश आहे. जखमी जवानांना जीएमसी जम्मूत दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीनंतर नगरोटातील लष्करी तळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. तसेच जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद केला आहे. दहशतवाद्यांनी जम्मू काश्‍मीरच्याच ट्रकचा वापर केला होता.  

सांबा सेक्टरमधून भारतात घुसले
जम्मू-काश्‍मीर पोलिस दलाचे महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले की, ‘जैशे’चे चारही दहशतवादी बुधवारी रात्री सांबा सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेतून घुसले असावेत. ते जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महागार्गावरून ट्रकने जात होते. नगरोटा टोल नाक्यावर रोखले असता दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. राष्ट्रीय महामार्गावरची या वर्षीची ही दुसरी चकमक होती. यापूर्वी जानेवारीत तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. तेही असेच ट्रकमध्ये लपून बसले होते.

आणखी वाचा:

पाकिस्तानातील महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल युरोपीय महासंघाच्या संसदेने व्यक्त केली चिंता 

संबंधित बातम्या