कोरोनाविरोधात Novavax Vaccine 90 टक्के प्रभावी

कोरोनाविरोधात Novavax Vaccine 90 टक्के प्रभावी
VACCINE 6.jpg

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना या महामारीमुळे जगभरात लाखो लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ (Scientist) जास्तीत जास्त परिणामकारक ठरणाऱ्या कोरोना लसींच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, नोवाव्हॅक्स (Novavax) या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीने दावा केला आहे की, त्यांची लस कोरोनाच्या व्हेरियंट विरोधात 90 टक्क्याहूंन अधिक प्रभावी आहे. अमेरिकेत (America) कंपनीने मोठ्याप्रमाणावर संशोधन केल्यानंतर ही लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे.

अमेरिकन कंपनी असलेल्या नोवाव्हॅक्सने मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर (Serum Institute of India) एका करारावर स्वाक्षरी केली होती. ज्या अंतर्गत 200 कोटी कोरोना लसींची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. (Novavax Vaccine is 90 percent effective against corona)

कंपनीकडून म्हटले की, कोरोनाविरोधात लस 90 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. प्रारंभीच्या आकडेवारीनुसार ही कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही समोर आले आहे. जगभरात कोरोना विरोधातील लसीची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेत मोठ्याप्रमाणात  कोरोना लसीकरण होत असल्याने लसींचा तुटवडा जाणवत आहे. तसेच नोवाव्हॅक्स लसीची वाहतूक आणि साठवण करणे सोपे असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे विकसनशील देशांना कोरोना लसींचा पुरवठा करण्यात ही लस मोठे योगदान देणार असल्याची शक्यता आहे. कंपनीने पुढे सांगितले, अमेरिका-युरोप आणि अन्य ठिकाणी सप्टेंबरच्या शेवटपर्यंत लसीकरणासाठी या लसीला मंजूरी मिळावी या दिशेने प्रयत्न सुरु आहेत आणि तोपर्यंत एका महिन्यामध्ये दहा कोटी लस निर्मिती करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

आतापर्यंत देशात तीन लसींना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कोव्हॅक्सिन (Covaxin), कोविशील्ड (Covishield) आणि स्पुटनिक व्ही *(Sputnik V.) लसीचा समावेश आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जगभरात कोरोनाचा घातक परिणाम पाहता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बायडन प्रशासन (Biden administration) कोरोना लस दान करण्यासाठी फायझर बायोएनटेक लसीचे 50 कोटी डोस खरेदी करत आहे. अमेरिकेन माध्यमांनी यासंबंधीचा खुलासा केला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com