पंतप्रधान मोदींचा भारतातील 'कार्बन फूट प्रिंट'चे प्रमाण कमी करून पॅरिस कराराचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

‘‘येत्या काही काळात भारत कार्बन पदचिन्हांचे (कार्बन फूट प्रिंट) प्रमाण ३० ते ३५ टक्के कमी करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करेल. पॅरिस करारातील उद्दिष्टांप्रत भारत निश्‍चित पोहोचेल,’’ अशा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

नवी दिल्ली :  ‘‘येत्या काही काळात भारत कार्बन पदचिन्हांचे (कार्बन फूट प्रिंट) प्रमाण ३० ते ३५ टक्के कमी करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करेल. पॅरिस करारातील उद्दिष्टांप्रत भारत निश्‍चित पोहोचेल,’’ अशा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

'जी-२०’ परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी सहभागी झाले. ते म्हणाले, ‘‘सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या साथीशी लढत आहे. वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाही सामना आपल्याला एकत्रितपणे करायला हवा. यासाठी सर्वसमावेशक व सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज आहे. पारंपरिक मूल्यांपासून प्रेरणा घेऊन भारताने कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याचे, निसर्गाचे नुकसान न होता विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पॅरिस कराराची उद्दिष्टपूर्ती निश्‍चितपणे करण्यात येईल. यासाठी अनेक क्षेत्रांत काम करण्यास सुरुवात केली आहे. एलईडी दिव्यांचा वापर, धूरविरहित चुली, एकदा वापरण्यायोग्य प्लॅस्टिकवर बंदी ही यासाठीची काही पावले 
आहेत.’’

मोदी म्हणाले, ‘‘या दशकात नैसर्गिक वायूचा वापर चार पटींनी वाढविण्यात येणार आहे. तेलशुद्धीकरण क्षमताही येत्या पाच वर्षांत दुप्पट करण्यात येईल. आज देश कार्बन पदचिन्हे ३० ते ३५ टक्के कमी करण्याच्या दिशेने जात आहे. मी जगाला जेव्हा हे सांगतो तेव्हा त्यांना आश्चर्याचा  धक्का बसतो. पण आम्ही ते करू  शकतो. नैसर्गिक वायूचा वापर वाढवून व तेलशुद्धीकरण प्रक्रिया क्षमता वाढवून हे  शक्य आहे. ठरावीक मुदतीच्या आधीच भारत अक्षय ऊर्जा निर्मिती प्रक्रिया पूर्ण करील. आज सौर ऊर्जेचा दर युनिटला दोन रुपयांपेक्षा कमी आहे, जो आधी युनिटला १२ ते १३ रुपये होता. सौरऊर्जा हा देशाचा प्राधान्यक्रम आहे. आम्ही १७५ गिगावॉट ऊर्जा सौरमाध्यमातून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ते २०२२ च्या आधीच पूर्ण केले जाईल. अक्षय ऊर्जेचे ४५० गिगावॉटचे उद्दिष्ट २०३० पर्यंत किंवा त्याआधीच आम्ही पूर्ण करू.’’

पर्यावरण बदलांचा सर्वाधिक फटका गरीब देशांना बसतो. नव्या आणि शाश्‍वत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन वाढविण्याची हीच योग्य वेळ आहे. सर्व देशांनी एकत्र येऊन हे साध्य करता येऊ शकेल. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अधिक वाचा : 

मसुरीतील ३९ ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण 

भाजपचा मोर्चा आता तमिळनाडूकडे..! 

 

संबंधित बातम्या