काँग्रेसला जूनमध्ये निर्वाचित नवा अध्यक्ष मिळेल?

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

काँग्रेसला जूनमध्ये निर्वाचित नवा अध्यक्ष मिळेल. पक्षाच्या आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये मे ऐवजी जूनमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे ठरले.

नवी दिल्ली: काँग्रेसला जूनमध्ये निर्वाचित नवा अध्यक्ष मिळेल. पक्षाच्या आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये मे ऐवजी जूनमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे ठरले. या निवडणुकीचे वेळापत्रक ठरविण्याचे सर्वाधिकार सोनिया गांधींना एकमताने सोपविण्यात आले. मात्र, नाराज नेत्यांच्या मागणीनुसार कार्यकारिणीची निवडणूक घेण्याबाबत स्पष्टता झालेली नाही. अध्यक्ष पदासोबतच कार्यकारिणीचीही निवडणूक घेतली जाते का, याबाबत पक्ष घटना तपासूनच निवडणूक होईल, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. 

काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर  संघटनात्मक निवडणुकीबाबत आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची बैठक झाली. सर्व कार्यकारिणी सदस्य, राज्यांचे प्रभारी आणि काँग्रेस शासीत राज्यांचे मुख्यमंत्रीही यात सहभागी झाले होते. 

निवडणुकीवरून खडाजंगी
काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचे प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांनी मे महिन्यात निवडणुकीचे वेळापत्रक दिले होते. मात्र, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे संघटनेची निवडणूक जूनमध्ये घ्यावी, अशी मागणी केली. त्यावर सर्वांनी सहमती व्यक्त करताना वेळापत्रक ठरविण्याचे सर्वाधिकार सोनिया गांधींकडे देण्यात आले. काँग्रेसमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार अध्यक्षपदाच्या या निवडणुकीसोबतच कार्यकारिणीची आणि पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचीही निवडणूक घेतली जावी, अशी मागणी झाली आणि त्यावरून बैठकीत भिन्न मतप्रवाह पुढे आले. 

नेताजी सुभाषचंद्र बोस: यश हे नेहमीच अपयशाच्या स्तंभावर उभे असते -

वाद नसल्याचे स्पष्टीकरण
बैठकीनंतर संघटना सरचिटणीस वेणुगोपाल आणि मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी संघटनात्मक निवडणुकीवरून कोणताही वाद झालेला नाही. अफवांकडे लक्ष देऊ नका. सर्वसंमतीनेच मे ऐवजी जूनमध्ये संघटनात्मक निवडणुकीचे वेळापत्रक करण्याचे ठरले. 

राहुल गांधी यांचा हस्तक्षेप
कार्यकारिणीमध्ये मिळालेले स्थान निवडणुकीमुळे नव्हे तर, नियुक्तीमुळे असून सर्वांची ओळख काँग्रेस पक्षामुळे आहे हे विसरले जाऊ नये, असा सूचक टोला अशोक गेहलोत यांनी लगावला. अंबिका सोनी यांनी कार्यकारिणी नियुक्तीचे अधिकार पक्षाध्यक्षांकडे सोपविण्याची आझाद यांची जुनी सूचना लक्षात आणून दिली. यामध्ये राहुल गांधींनी हस्तक्षेप केला आणि काँग्रेससमोर पक्षांतर्गत निवडणुका नव्हे तर, शेतकरी आंदोलन हा महत्त्वाचा मुद्दा असायला हवा, असे सांगितले. दरम्यान, संघटनात्मक निवडणुकीमध्ये आधी जिल्हा, प्रदेश, अखिल भारतीय काँग्रेस महासमिती आणि त्यानंतर अध्यक्षांची निवडणूक होत असते. मात्र यावेळी पहिल्यांदा अध्यक्षांची निवडणूक होणार असल्याने यंदाची निवडणूक ‘पिरॅमिड’ पद्धतीची असल्याची टिप्पणी मुकुल वासनिक यांनी केल्याचे कळते. 
 

संबंधित बातम्या