गोमेकॉ इस्पितळात औषधे खरेदीत गैरव्यवहार, काँग्रेसचा आरोप

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

औषध खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा
काँग्रेसचा आरोप ः गोमंतकीयांना डावलून ‘वेल्नेस फॉरएव्हर’ला प्राधान्य

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ प्रशासनाने घाऊक औषधे खरेदी न करता ती किरकोळ पद्धतीने करून सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. गोव्यातील घाऊक औषध वितरकांना डावलून ‘वेल्नेस फॉरएव्हर’ या औषध कंपनीकडून तीन ते चारपटीच्या वाढीव दराने ती खरेदी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचे खाते काढून घेऊन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यातील रुग्णांना गोमेकॉतील सेवा व औषधे मोफत दिली जातात. मात्र, जी औषधे गोमेकॉच्या मोफत फार्मसीमध्ये मिळत नाही ती या रुग्णांना ‘वेल्नेस फॉरएव्हर’ या फार्मसीमधून खरेदी करावी लागत आहेत. या औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने घाऊक दराऐवजी किरकोळ दराने या औषधांची बिले गोमेकॉ इस्पितळ प्रशासनाला दिली आहेत. या बिलांमध्ये औषधांची किरकोळ किंमत ही घाऊक किंमतीपेक्षा तीन ते चार पटीने अधिक आहेत. या इस्पितळामध्ये मोफत फार्मसीसाठीच्या औषध पुरवठ्यासाठी वार्षिक, लघु व आपत्कालीन अशा तीन प्रकारच्या निविदा काढण्याची पारदर्शक प्रक्रिया प्रस्थापित आहे. वर्षासाठी सुमारे ८१ कोटींची निविदा काढण्यात येते. या औषध पुरवठ्यासाठी जागतिक निविदा काढण्यात येते व त्यामधील अटी व शर्ती गोमंतकीय औषध पुरवठादार वितरकांना अपात्र ठरवण्यासाठी किचकट करण्यात येतात.

२०१४ - १५ मध्ये आवश्‍यक नव्या औषधांची यादी (एनएलईएम) व २०१६ -२०१७ साठी बिगर एनएलईएम निविदा काढली गेली त्याला गोमंतकीय तसेच काही बिगर गोमंतकीय औषध पुरवठा वितरकांनी प्रतिसाद दिला. त्यामध्ये ‘वेल्नेस फॉरएव्हर’ या कंपनीचाही समावेश होता. या कंपनीला निविदा मिळवून देण्यासाठी काही अटी या कंपनीच्या फायद्यासाठी करण्यात आल्या होत्या. या कंपनीसंदर्भात माहिती हक्क कायद्याखाली माहिती मागूनही ती गोमेकॉचे डीन व सरकारने दिली नाही. या प्रकरणाबाबत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही विधानसभेत प्रश्‍न विचारला होता व त्यालाही उत्तरे व्यवस्थित देण्यात आली नव्हती. २०१६ - १७ मध्ये निविदा काढली होती, ती एप्रिल २०१९ पर्यंत होती.

निविदा जारी करण्यात उशीर झाल्याने गोमंतकीय औषध पुरवठादार वितरकांना जुन्याच दराने औषधांचा पुरवठा करण्याची अट घालण्यात आली व ती त्यांनी स्वीकारली होती. मात्र, आरोग्यमंत्र्यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावून डिसेंबर २०१८ मध्ये तातडीने औषध पुरवठा करण्याची निविदा ‘वेल्नेस फॉरएव्हर’ला दिली. हे प्रकरण संयुक्त लेखा संचालकांच्या लक्षात येताच त्यांनी हरकत घेतली. २५ टक्के (मूळ ८१ कोटीच्या निविदेपैकी) औषध पुरवठा निविदा जुन्या गोमंतकीय वितरकांना देण्यात आली, तर ७५ टक्के औषधे ‘वेल्नेस फॉरएव्हर’कडून खरेदी करण्यात आली. ही औषधे कोणत्या कंपनीकडून ते खरेदी करतात याचीही माहिती सरकार देत नाही. ‘वेल्नेस फॉरएव्हर’कडून तातडीने औषधांची खरेदी करण्याचे बंद केले जावे. औषधांची खरेदी ही केंद्रीयकृत केली जावी व घाऊक कमी किंमतीने सर्वाधिक कमी औषध पुरवठा वितरकांकडून खरेदी करावा, असे चोडणकर म्हणाले.

भाजपा सोडणार नाही. सत्कारमुर्ती कवळेकर

‘डीन व इतर अधिकाऱ्यांना निलंबित करा’
गोमेकॉतील हे घोटाळ्यचे प्रकरण आरोग्य सचिवांकडे गेले तरी त्याकडे डोळेझाक केली गेली. ‘वेल्नेस फॉरएव्हर’ फार्मसीकडे घाऊक औषधे विकण्याचा परवाना नसताना किरकोळ विक्री परवान्यावर ही औषधे इस्पितळाला उपलब्ध करत आहेत. अन्न व औषध प्रशासन खात्याने छापा टाकून कारवाई करायला हवी. मात्र, तीसुद्धा केली जात नाही. मुख्यमंत्री व पंतप्रधानांना तक्रार देऊनही कोणीच दखल घेत नाही. करदात्यांच्या तसेच सरकारच्या पैशांची लूट करण्याचे गौडबंगाल सुरू आहे. त्यामुळे या घोटाळ्यात गुंतलेल्या डीन व इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

 

संबंधित बातम्या