विठ्ठालापूर - साखळी बाजार नवीन पुलाची पायाभरणी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

पुढील ५० वर्षे डोळ्यासमोर ठेवून साखळीचा विकास : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

विठ्ठलापूर ते साखळी बाजार नवीन पुलाची पायाभरणी करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूस मयेचे आमदार प्रवीण झांट्ये, साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी

साखळी : विठ्ठलापूर ते साखळी बाजार या नवीन पुलामुळे विठ्ठलापूर व साखळी जोडली जाणार असून पुढील ५० वर्षे डोळ्यासमोर ठेवूनच साखळीतील विकासकामे हाती घेण्यात येत आहेत, असे उद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

विठ्ठलापूर ते साखळी बाजार येथील नवीन पुलाच्या पायाभरणी सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष अंकीता नावेलकर, नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, उपनगराध्यक्ष कुंदा माडकर, नगरसेवक शुभदा सावईकर, रश्मी देसाई, दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, म्हापशाचे आमदार तथा गोवा साधन सुविधा महामंडळाचे उपाध्यक्ष जोसुआ डिसोझा, कारापूर- सर्वण सरपंच सुषमा सावंत, डिचोली तालुका मामलेदार प्रविणजय पंडित, गोवा साधन सुविधा महामंडळाचे संचालक दत्ताराम चिमुलकर, भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, की विठ्ठालापूर - साखळी बाजार जोडणारा जुना पूल हा फक्त लहान पदपूल होता. यावरून वाहने हाकता येत नव्हती. हा पूल मोडून नवीन पूल हा दोन्ही बाजुंनी वाहने नेणारा रुंद असेल. विठ्ठलापूरहून साखळी बाजार ते साखळी कदंब बसस्थानक असा पर्यायी रस्ताही उपलब्ध होईल. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. सध्या साखळीहून विठ्ठालापुरहून डिचोलीला जोडणारा मुख्य मार्गावरील एकच पूल व रस्ता आहे. त्यामुळे विठ्ठलापूरचा नवीन पूल व रस्ता त्या रस्त्याला पर्यायी ठरणार.

साधनसुविधा महामंडळातर्फे साखळीत अनेक विकासकामे पूर्ण करू शकलो. एकेकाळचा भरगच्च प्रसिध्द साखळी बाजार व्यवसाय कमी का झाला यासाठी लोकांनी विचार करावा. पार्किंग व एकेरी मार्ग नसल्याने बाजारात वाहने येत नाहीत. बाजारवासीयांनी बाजाराच्या विकासासाठी नवीन संकल्पना तयार केल्या पाहिजे. मासळी, फळे, भाजी केवळ बाजारातच विकली जावी. जे लोक मिळेल तिथे रस्त्याच्या बाजुला बसतात त्यांना बंदी घालावी. तरच बाजाराला अच्छे दिन येतील.
साखळीचा कदंब बसस्थानक व मलनिस्सरण प्रकल्प त्वरित पूर्ण होईल. नागरिकांनी सहकार्य केल्यास दोन वर्षांत साखळी शहराला नवी झळाळी प्राप्त करणार असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी म्हणाले, हा पूल व्हावा ही आपली लहानपणापासूनची इच्छा. विठ्ठलापूर-साखळी बाजार जोडण्याचे काम सुरू झाल्याने आनंद झाला आहे. मुख्यमंत्री साखळीचेच असल्याने विकासासाठी चांगली संधी आहे. आपण साखळी पालिकेतर्फे बारा विकास प्रकल्पांची यादी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहे. त्यांनी प्राधान्य देऊन हे प्रकल्प मार्गी लावावे. किल्ल्याखालील दुकाने नवीन काडा मार्केटमध्ये स्थलांतर केलेली आहेत. पालिका इमारतीसमोर पार्किंग उभारून, मासळी मार्केट समोर सपाटीकरण करून सोमवारचा आठवड्याचा बाजार या ठिकाणी भरविण्यात येणार. या ठिकाणच्या नाल्याचे काम जास्त खर्चीक आसल्याने पालिकेला शक्य नाही सरकारने करावे.

साखळी पालिकेला ‘ब’ दर्जा देण्यात आला तो अद्याप नावालाच आहे. ‘ब’ दर्जानुसार साखळी पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही, खास अधिकारी नाही, खास निधीही दिलेला नाही तो सरकारने द्यावा.कारापूर सर्वणच्या सरपंच सुषमा सावंत म्हणाल्या, साखळी बाजारात प्रवासी वाहतूक येत नसल्याने बाजाराला अवकळा आली होती. या नवीन पूलामुळे साखळी बाजारात पुन्हा प्रवासी बसेस सुरू होतील, बाजाराला पुन्हा भरभराट येईल. म्हापशाचे आमदार तथा साधनसुविधा महामंडळाचे अध्यक्ष जोसुआ डिसोझा म्हणाले, दोन गावे जोडणारा या महत्वपूर्ण पुलासाठी ८ कोटी खर्च होणार असून काम चार महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश मंडळाला दिलेला आहे. यावेळी आनंद काणेकर यांनीही आपले विचार मांडले.

गावचे अस्तित्व आणि गावपण नष्ट होणार आहे.

साखळी बाजार वाळवंटी नदीच्या ठिकाणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नारळ वाढवून नवीन पुलाची पायाभरणी करण्यात आली. तसेच नामफलकाचेही अनावरण करण्यात आले. नंतर साखळी बाजारातील सप्तशती भूमिका मंदिरात आयोजित सोहळ्यात विठ्ठलापूर सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. क्रांती नार्वेकर व कला पाऊसकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा स्वागत केले. सूत्रसंचालन विजयकुमार वेरेकर यांनी केले, तर दत्ताराम चिमुलकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या