‘मोप’ सोबत अंकोला विमानतळाची लागणार स्पर्धा

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

मोप विमानतळाचे काम सुरू असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळ येत्या काही दिवसातच कार्यान्वित करण्यासाठी माजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रयत्न चालवले आहेत.

पणजी: मोप विमानतळाचे काम सुरू असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळ येत्या काही दिवसातच कार्यान्वित करण्यासाठी माजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रयत्न चालवले आहेत. त्याच्या जोडीला आता मोपा विमानतळाशी स्पर्धा करण्यासाठी कर्नाटक सरकारने उत्तर कन्नड जिल्ह्यात कारवारलगत अंकोला येथे पूर्ण क्षमतेचा विमानतळ सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारण्याचे ठरवले आहे. कारवारातील जिल्हा प्रशासनाने यासाठी जमिनीची पाहणी केली असून या आठवड्यात कोणत्या जमीन मालकाला किती भरपाई द्यावी लागेल, याचा अहवाल कारवारच्या जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.

पणजीपासून १४० किलोमीटरवर हा नवा विमानतळ बांधण्यात येणार आहे. सध्या कारवार, अंकोला, कैगा, कद्रा, दांडेली, जोयडा, गोकर्ण, कुमठा, शिर्सी, होन्नावर, भटकळ पर्यंतचे लोक सोयीचे म्हणून गोव्यातील दाबोळी विमानतळाचा वापर करतात. मंगळूर येथे विमानतळ आहे, तरी त्यांना गोव्यात येणे सोयीचे वाटते कारण गोव्यातील विमानतळाहून विदेशात जाण्यासाठी बऱ्यापैकी विमानसेवा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असली तरी ती आता कोविडचा धोका कमी झाल्यानंतर कधीही सुरू होऊ शकते.

कर्नाटक सरकारने विमानतळ बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला आहे. नौदलाचा कारवारलगत आशियातील सर्वात मोठा नौदल तळ आहे. त्या तळाला लागून अलागेरी व भाविकेर या गावांत ९७.१ एकर जमिनीत नौदलाच्या हवाई विभागासाठी एक धावपट्टी बांधण्याचा प्रस्ताव होता. आता तेथेच विमानतळ बांधण्यात येणार आहे. सध्या ७० आसनी विमान उतरविण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न असला तरी प्रत्यक्षात बी७३७ आणि ए ३२० सारखी मोठी विमाने उतरवण्यासारखी धावपट्टी तेथे विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. तीन हजार मीटरची धावपट्टी बांधली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या साऱ्या कामाची जबाबदारी कर्नाटक सरकारने पायाभूत सुविधा विकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे सोपवली आहे.

या जागेच्या एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ व लोहमार्ग असल्याने माल वाहतुकीसाठीही हा विमानतळ योग्य ठरणार असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. कर्नाटक सरकारने कारवारलगतचे बेलेकेरी हे बंदर मोठे बंदर म्हणून विकसित करावे असा प्रस्ताव केंद्रीय जहाजोद्योग मंत्रालयाकडे पाठवला आहे. त्या बंदरापासून हा प्रस्तावित अंकोला विमानतळ जवळच आहे. एकीकडे मुरगाव बंदरातील व्यवसाय घटत असताना कर्नाटक उरला सुरला व्यवसाय पळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. मुरगाव बंदरात हाताळल्या जाणाऱ्या कोळशाविषयी आंदोलने सुरू झाली असल्याने त्याची हाताळणीही बेलेकेरी बंदरात करण्याविषयी पुढेमागे विचार होऊ शकतो.

कर्नाटकात सध्या कलबुर्गी, बिदर येथे छोटे विमानतळ आहेत. विजयापूर व शिमोगा येथेही छोटे विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या साऱ्यांच्या तुलनेत अंकोल्याचा विमानतळ मोठा आणि देशाच्या महत्त्वाच्या विमानतळांशी आणि पुढे जगाशी जोडणारा असावा असा कर्नाटक सरकारचा प्रयत्न आहे.

सध्या बंगळूर ते कलबुर्गी अशी दिवसातून दोनवेळा विमानसेवा आहे तर बंगळूर ते बिदर अशी दिवसातून एकदा विमानसेवा आहे. अंकोला येथे विमानतळ झाल्यावर  बंगळूर आणि मुंबईशी कारवार व्यवस्थितपणे जोडले जाईल असे कर्नाटक सरकारला वाटते. कारवारलगतच्या कैगा अणू ऊर्जा प्रकल्पात पाच हजार जण कार्यरत आहेत, कारवारच्या नौदल तळावर साठेक हजार जण काम करतात. हे सारे सध्या गोव्याच्या विमानतळाचा वापर इतरत्र जाण्यासाठी करत असतात. अंकोला येथे विमानतळ झाल्यानंतर हे सारे अंकोल्याच्या विमानतळाचा वापर करतील असे कर्नाटक सरकारचे नियोजन आहे.

आणखी वाचा:

मुरगाव पालिकेची ‘डार्क स्पॉट’ सुशोभीकरण योजना लालफितीत बंद -

कर्नाटक सरकारच्या माहितीनुसार पुढीलवर्षी मध्यावर या विमानतळाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल आणि २०२४ मध्ये हा विमानतळ पूर्ण होईल. यासाठी कर्नाटक सरकार व भारतीय विमानतळ प्राधिकरण एका संयुक्त कंपनीची स्थापना करणार आहे. त्याच्या तयारीलाही कर्नाटक सरकारने गती दिली आहे.

कारवार परिसरातील पर्यटनस्थळे

  • दांडेली- जंगल सफारी, रिव्हर राफ्ट,
  • अत्तीवेरी पक्षी अभयारण्य,
  • गोकर्ण येथील ओम आकाराचा किनारा व मंदिरे
  • मुरुडेश्वर येथील किनारा व मंदिर
  • याणा येथील पाषाणे
  • कुमठा येथील लाकूडकाम
  • कुंडले येथील किनारा.

अंकोल्याचा विमानतळ हा निश्चितच गोव्याच्या विमानतळाशी स्पर्धा करेल. कर्नाटकात येणारे पर्यटक थेटपणे अंकोल्याच्या विमानतळावर यापुढे उतरतील. उत्तर कन्नड जिल्हा हा निसर्ग  पर्यटनासाठी गोव्याशी तोडस तोड असा आहे.
- शिवराम हेब्बार, पालकमंत्री कारवार

संबंधित बातम्या