गोवा डेअरीचे १४ लाखांचे नुकसान

27 thousand 650 liters of milk wasted Of Goa Dairy
27 thousand 650 liters of milk wasted Of Goa Dairy

फोंडा: गोवा डेअरीच्या अर्ध्या अधिक दुधाची वाहतूक करण्यास वाहतूकदार टेंपोचालकांनी नकार दिल्याने गोवा डेअरीला चौदा लाख रुपयांचा फटका बसला. हा प्रकार आज (बुधवारी) घडला असून गोवा डेअरीतील २७ हजार ६५० लिटर दूध पडून राहिल्याने गोवा डेअरीला हे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सुरळीत दूध वितरणासाठी गोवा डेअरीने दुसरी व्यवस्था केली असल्याचे गोवा डेअरीच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. 
 

सकाळी पणजी, डिचोली, काणकोण तसेच वेर्णा व इतर ठिकाणी गोवा डेअरीचे दूध पोचले नाही. राज्यभरातील एकूण ३६ रूटपैकी केवळ सोळा वाहतूकदारांनी दुधाची वाहतूक केली. मात्र वीसजणांनी दूध वाहतूक करण्यास नकार दिल्याने हा प्रसंग उद्‌भवला. दूध वाहतूक करण्यास नकार दिल्यामुळे गोवा डेअरीसमोर ही आणीबाणी उद्‌भवली. मात्र यावर मात करीत आम्ही दुसरी व्यवस्था केली असल्याची माहिती गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी दिली. यावेळी गोवा डेअरीचे इतर अधिकारी उपस्थित होते. गोवा डेअरीत अशाप्रकारची मनमानी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही अध्यक्ष तसेच प्रशासनाने दिला आहे. 


दूध वाहतूक करणाऱ्या टेंपोचालकांचे कंत्राट यापूर्वीच संपले असून गेल्या चार वर्षांत यासंबंधीची निविदाच काढलेली नाही, त्यामुळेच हा वाद निर्माण झाला आहे. वाहतूकदारांनी आपली वाहने गोवा डेअरीसमोरच पार्क केली आहेत. दुर्गेश शिरोडकर व गोवा डेअरीच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांपासून दुधाचा पुरवठा करणाऱ्या रूटच्या निविदाच काढलेल्या नाहीत. काही रूटसाठी तर अवास्तव व भरमसाट पैसे दिले जात असून त्याचा ताळमेळ कुठेच लागत नाही. ही सगळी अंदाधुंदी बंद करून एकसूत्रता आणून गोवा डेअरीला नफ्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मागच्या सात महिन्यात काटकसर तसेच अवास्तव खर्च कपात करून सुमारे दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा नफा केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. वाहतूक व्यवस्थेतील सावळागोंधळ दूर करण्यासाठी गोवा डेअरीने दूध वाहतुकीसंबंधी निविदा काढली असता बहुतांश वाहतूकदार टेंपोचालकांनी निविदा भरली नाही. निविदा भरलेल्या कुळेतील एका नवीन टेंपोचालकाला दूध वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली असता इतरांनी त्याला आक्षेप घेऊन पूर्वीच्याच वाहतूकदाराला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मात्र कुळेतील अगोदरच्या टेंपोचालकाने आपण हा रूट सोडत असून आपला हिशेब करावा, असे पत्र दिले असताना इतर टेंपोचालकांनी आडमुठे धोरण अवलंबून दुधाची वाहतूकच बंद केली, असे यावेळी दुर्गेश शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


गोवा डेअरीच्या कार्यालयात येऊन काही वाहतूकदारांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. यासंबंधी फोंडा पोलिसांत तक्रार देण्यात आली. यापूर्वीही गोवा डेअरीसमोर तलवारी नाचवून काहीजणांनी नंगानाच केला, यासंबंधीही तक्रार दिली असली तरी पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झाली नसल्याचे गोवा डेअरीतर्फे स्पष्ट करण्यात आले. आताही मनमानी मोडून काढत दुधाचा व्यवस्थित पुरवठा करण्यासाठी गोवा डेअरीकडून आवश्‍यक व्यवस्था केली असल्याची माहिती प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर तसेच व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी दिली आहे. दरम्यान, दूधवाहू टेंपोचालकांनी आपली समस्या सरकारकडे मांडली असून यासंबंधीचे पत्र गोवा डेअरीला अगोदरच दिल्याची माहिती देण्यात आली.

दूध उत्पादकांचे काय...!
गोवा डेअरीला तोटा झाला तरी वाहतूकदार आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार आणि बिले मिळतील, मात्र दूध उत्पादकांचे काय, दिवसभर राबून दूध उत्पादकाला पुरेसा लाभ होत नाही, तरीपण पारंपरिक व्यवसाय गोव्यात दूध उत्पादकांनी सुरू ठेवला आहे. मात्र अशारीतीने दुधाची नासाडी केली तर त्याचा फटका दूध उत्पादकांनाच बसणार आहे, असे गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com