ॲप टॅक्सी सेवा रद्द होत नाही, तोवर डिजीटल मीटर्स लावणार नाही : टॅक्सी संघटनेचा निर्णय

App will not install digital meters until taxi service is canceled: Taxi Association's decision 
App will not install digital meters until taxi service is canceled: Taxi Association's decision 

पणजी : राज्यातील ॲप अग्रिगेटर्स व गोवा माईल्स ॲप टॅक्सी सेवा रद्द होत नाही तोपर्यंत टॅक्सींना डिजीटल मीटर्स न लावण्याचा निर्णय टॅक्सी (Taxi) मालक संघटनेने घेतला. वाहतूक खात्याने आजपासून डिजीटल मीटर्स बसविण्याच्या प्रक्रिया सुरू केल्याने ती तहकूब करण्याची विनंती संचालकांना संघटनेच्या शिष्टमंडळाने भेटून केली. जोपर्यंत टॅक्सी मालकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत डिजीटल मीटर्सची (Digital Meter) सक्ती केली जाऊ नये अशी विनंती या शिष्टमंडळाने केली. 

वाहतूक संचालक राजेंद्र सातार्डेकर यांची टॅक्सी मालक शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर माहिती देताना संघटनेचे नेते बाप्पा कोरगावकर यांनी सांगितले की, वाहतूक संचालकांनी संघटनेचे म्हणणे ऐकून घेऊन आमच्या जी विनंती व मागण्या आहेत त्या लेखी स्वरुपामध्ये द्याव्यात, त्या सरकारकडे मांडतो असे आश्‍वासन दिले. त्यानुसार येत्या काही दिवसात निवेदन खात्याला सादर केली जाईल. डिजीटल मीटर्स बसविण्यास संघटनेने नकार दिला नव्हता मात्र संघटनेच्या मागण्यांवरही विचार करण्याची विनंती वारंवार अर्ज करून केल्या होत्या. अजूनही त्यावर तोडगा निघत नाही, असे ते म्हणाले.  

ॲप ॲग्रीगेटर्स व गोवा माईल्स ॲप टॅक्सी सेवा रद्द करण्यासाठी जे आंदोलन सुरू करण्यात आले होते, ते  अजूनही सुरू आहे. रस्त्यावर टॅक्सी धावत नाहीत. मात्र, सर्व टॅक्सी मालकांनी संघटितपणे हे आंदोलन सुरूच ठेवलेले आहे. कोविड संकटात कोणी घराबाहेर येऊ नका अशा विनंत्या टॅक्सी चालकांना केल्या आहेत. त्यामुळे कोणीही रस्त्यावर येऊन आंदोलन करत नाही. या संकटातून वाचल्यास टॅक्सी व्यवसाय करता येईल त्यामुळे हे आंदोलन शांतपणे सुरू ठेवण्यात आले आहे. टॅक्सी परवाना नुतनीकरण करताना खात्याने १४० नियमाखाली डिजीटल मीटर्स सक्ती केली आहे. खात्याने टॅक्सी व्यवसायिकांना कधीच विश्‍वासात घेतले नाही. प्रत्येकवेळी निर्णय लादून नाहक सतावणूक केली आहे. डिजीटल मीटर्स हे मोफत बसविले जातील, असे सरकारने सांगितले होते. मात्र, त्यानंतर या मीटर्सचा ५० टक्के खर्चाचा भार सरकार उचलेल असे आश्‍वासन दिले होते. आता तर या मीटर्ससाठी टॅक्सी चालकांना स्वतः पदरमोड करून ते बसवावे लागणार आहेत, असे कोरगावकर यांनी सांगितले. 

टॅक्सींना मीटर्स बसविले नाहीत म्हणून टीटीएजीने अवमान याचिका सादर केली आहे. या याचिकेत गोवा खंडपीठाने डिजीटल मीटर्स बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यास १५ दिवसांची शेवटची संधी दिली होती. ती मुदत येत्या २२ मे रोजी संपत असल्याने सरकारने आजपासूनच (२० मे) ही प्रक्रिया सुरू करून मीटर्स न बसविणाऱ्या टॅक्सींचा परवाना नुतनीकरण न होता आपोआपच रद्द होणार आहे. नव्या ॲप ॲग्रिगेटर्सना परवानगी देऊ नये.

राज्यातील सर्व टॅक्सींचे परवाने येत्या जुलैपर्यंत वैध आहेत, त्यामुळे वाहतूक खाते हे परवाने रद्द करू शकत नाही. कोणीही हे मीटर्स टॅक्सींना लावू नये असे एका संघटनेच्या नेत्याने सांगितले. राज्यात ‘अपना भाडा’ ॲप टॅक्सी सेवा करण्यात आली आहे. या सेवेला कोणतीही परवानगी नसताना या ॲप आधारित टॅक्सी गोव्यात दिसत आहेत. त्यामुळे सरकारने अगोदर गोवा माईल्स ॲप टॅक्सी सेवा रद्द करावी व आणखी नव्या ॲप ॲग्रिगेटर्सना परवानगी दिली जाऊ नये असे टॅक्सी मालकांनी मत व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com