मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पायलटला मागणी पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

कोविड महामारीमुळे अनेक व्यावसायिक संकटात सापडले आहेत. मोटारसायकल पायलट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर आज सकाळी आभासी पद्धतीने बैठक झाली.

पणजी: कोविड महामारीमुळे अनेक व्यावसायिक संकटात सापडले आहेत. मोटारसायकल पायलट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर आज सकाळी आभासी पद्धतीने बैठक झाली. या बैठकीवेळी संघटनेने ५० वर्षांवरील पायलटांसाठी २ हजार रुपयांची आर्थिक सहाय्य योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही योजना पुढील महिन्यापासून सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. 
 

भाजप प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक यांच्यासह मोटारसायकल पायलट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातून दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत चर्चा केली. यावेळी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोविड महामारीमुळे त्यांचा व्यवसाय संकटात आहे. कोरोनामुळे कोणीही प्रवासी मोटारसायकल पायलट सेवा घेण्यास घाबरतात. या व्यवसायाशिवाय त्यांना इतर कोणताही आधार नाही. त्यामुळे सरकारने ही योजना त्वरित सुरू करून आधार देण्याची विनंती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांच्यावरील संकटाची सरकारला माहिती आहे. त्यांची मागणी योग्य असून त्यासाठी सरकारतर्फे योग्य आर्थिक सहाय्य दरमहा सुरू करण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील असे 
सांगितले. 

राज्यात सुरक्षित व भरवसा असलेला मोटार सायकल पायलट व्यवसायही बंद होण्याच्या मार्गावर आला आहे. बिनधास्तपणे मोटार सायकल पालटची सेवा घेणाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. पूर्ण दिवस उन्हात उभे राहूनही एनेकदा एकही प्रवासी मिळत नाही अशी स्थिती होते. या व्यवसायावर आलेल्या संकटामुळे सरकारने असलेली मोटारसायकल बदलून नवीन खरेदीसाठी अनुदान देण्याचे तसेच ‘कोविड-१९’च्या पार्श्‍वभूमीवर मोटारसायकल पायलटांसाठी योजना सुरू करण्याच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले.

आणखी वाचा:

गोवा काँग्रेस पक्षबांधणीसाठी सध्याचे प्रदेशाध्यक्ष असमर्थ -

संबंधित बातम्या