सावधान! गोव्यात कोरोना पुन्हा फोफावतोय; राज्यातील परिस्थितीचा स्पेशल रिपोर्ट

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

गुरुवारी राज्यात ५ कोरोना संसर्गीत व्यक्ती दगावल्या, तर ७५७ नवे कोरोना ससर्गीत व्यक्ती सापडले. राज्यात पहिल्यांदाच कोरोना संसर्गीत बरे होण्याची टक्केवारी ९० टक्केपेक्षा खाली आली आहे.

पणजी: राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असून कोरोना नियंत्रणासाठी सरकारने ठोस उपाययोजना केल्‍या आहेत. तरीही कोरोना नियामवलीचे पालन न करता लोकांची गर्दी करण्याची वृत्ती यामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आहे. गुरुवारी राज्यात 5 कोरोना संसर्गीत व्यक्ती दगावल्या, तर 757 नवे कोरोना ससर्गीत व्यक्ती सापडले. राज्यात पहिल्यांदाच कोरोना संसर्गीत बरे होण्याची टक्केवारी 90 टक्केपेक्षा खाली आली आहे. तसेच त्‍यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगावी व सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्‍य खात्‍यातर्फे करण्‍यात आले आहे.( Corona infection is on the rise again in Goa )
आठ दिवसांत २२ मृत्‍युमुखी
राज्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 89.87  टक्केपेक्षा खाली आली असून आजच्या दिवशी राज्यात सक्रिय कोरोना रग्णांची संख्या 5682 एवढी झाली आहे. आज कोरोनामुळे दगावलेले पाचही पुरुष आहेत. गेल्या आठ दिवसांत तब्बल 22 व्यक्ती कोरोनामुळे मृत झाल्‍या आहेत.
चोवीस तासांत
757 कोरोनाबाधित
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2711 कोरोनासाठी नमुने तपासण्यात आले, त्यात 757 नवे कोरोना संसर्गीत रुग्ण सापडले. गोव्यातील आत्तापर्यंतची ही सर्वात उच्चांकी संख्या आहे. तसेच आज फक्त 182 कोरोना संसर्गीत बरे झाले. गेल्या 24 तासांत कोरोनावर उपचार घेणाऱ्या 5 व्यक्ती दगावल्या. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या 862 एवढी झाली आहे.   
प्रमुख शहरांत संसर्ग
मडगाव, पर्वरी, फोंडा, पणजी येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार सुरू झाला आहे. लोकांनी सावधगिरी न बाळगल्‍यास येत्या काही दिवसांत तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील 18 ठिकाणी 100 पेक्षा जास्त सक्रिय कोरोना संसर्गीत रुग्ण आहेत. देशात व विशेषत: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे तेथे संचारबंदी लावलेली आहे. 
राज्यातील शंभरपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असेलली १८ ठिकाणे 
मडगाव - 660, पर्वरी -558, म्हापसा -401, पणजी - 398, फोंडा -380,  कांदोळी - 321, कुठ्ठाळी - 284, वास्को -271, चिंबल -204,  कासावली -174, शिवोली -164,  खोर्ली -137, डिचोली -134, पेडणे - 134, साखळी - 124, हळदोणा -116,  चिंचणी - 110, शिरोडा -103.
दरम्‍यान. गुरुवारी लसीकरणाचा  एकूण आकडा 10,198  झालेला आहे. आरोग्य खात्याने  केलेले प्रयत्न यशस्वी  होत आहेत.

गोवा : दहावी बारावी परिक्षाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही; प्रमोद सावंत 

दक्षिण गोवा इस्‍पितळात आपत्‍कालीन विभाग
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य खात्याने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्‍यामुळेच दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा इस्पितळात आपत्कालीन विभाग स्थापण्‍याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी तशी सूचना आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना आज केल्‍या. 
गोवा वैद्यकिय महाविद्यालयात कोरोना उपचारासाठी वेगळे विभाग स्थापन करण्यात आले आहेत. तेथे सर्व प्रकारच्या सोयी उपलब्‍ध केल्‍या आहेत. आयटीयू, आयसीयू या सोयींनी युक्त असे कोरोना उपचार विभाग आहेत. त्याच धर्तीवर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात अतिदक्षता उपचार विभाग स्थापून तेथे आयसीयू व आयटीयू उपचार प्रणाली उपलब्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर कोरोना उपचारासाठी वापरल्‍या  जाणाऱ्या ईएएसआय इस्पितळातही आयसीयू व आयटीयू युनीट उपलब्ध केले जाणार असल्याचे आरोग्‍यमंत्री राणे यांनी सांगितले. कोरोना रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत, यासाठी योग्‍य पावले सरकार उचलत आहे. लोकांनी कोरोना नियामवलीचे पालन करावे, असे आवाहन राणे यांनी केले आहे.
मृत्यू दर वाढला
1 ते 8 एप्रिल दरम्यान 12 जणांचा मृत्यू झाला. गेल्‍या सात दिवसांत 9 एप्रिलपासून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तो 0.48 टक्के होता.  आता 0.60 टक्के झाला आहे. एकूण 5 हजार 168 रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर हा ०.५१ टक्के आहे. चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. तो दर तब्बल 28 टक्के झाला आहे. 21 ऑक्टोबरनंतरचा हा उच्चांक आहे. 1 एप्रिल रोजी हा दर 10.2 टक्के होता. रुग्ण बरे होण्याचा दरही घटला आहे, तो 89.9 टक्के झाला आहे. 16 ऑक्टोबर रोजी तो 89.7 टक्के होता. त्यानंतर तो दर वाढून परिस्थिती सुधारली होती.
1 एप्रिलनंतर केंद्रवार रुग्णसंख्या अशी
मडगाव - 475, पर्वरी- 401, फोंडा- 243, पणजी- 222, कांदोळी- 196, कुठ्ठाळी- 213, म्हापसा- 326, वास्को- 159, शिवोली- 104, कासावली- 103, चिंबल- 148, खोर्ली- 97, साखळी- 83, हळदोणे- 73, पेडणे- 108, चिंचणी- 64 आणि शिरोडा - 110.

म्हणून लहानगे सुपरस्प्रेडर....
घरात सर्वांचे लाडके असल्यामुळे त्यांना कोणीही जवळ घेते. तसेच मास्क लावणे, अंतर ठेवून बोलणे, हात वेळोवेळी स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे सज्ञानच त्यांना नसते. ‘इनडोअर गेम्स’मध्ये मुलांचा एकमेकांशी संपर्क येतो. घरात कोणी कोरोना बाधित असल्यास लहान मुलांची चाचणी करून त्यांना आजी-आजोबांकडे पाठविले जाते. सुरवातीला जरी चाचणी निगेटिव्ह आली तरी चार-पाच दिवसांनंतर ती पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे लहानगे सुपरस्प्रेडर ठरू शकतात, अशी माहिती आरोग्य खात्यातील डॉ. अनुप नेत्रावळकर यांनी दिली.

लहान मुलांची विशेष काळजी घ्‍या
राज्यात कोरोना बाधितांच्या (Corona Patients) संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे जरासे अनभिज्ञ असलेल्या लहानग्यांची या काळात विशेष काळजी घेण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेने सर्वांनाच प्रभावित केले आहे. कोरोना विषाणूतील हे नवीन उत्परिवर्तन (म्यूटेशन) लहान मुलांसाठी अधिक धोक्याचे ठरत असल्याचे डॉक्टर सांगतात. तसेच 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात लहानग्यांचा समावेश नाही. लहान मुलांना देता येईल, अशी लस सध्या उपलब्ध नसल्याने सध्या खबरदारी हाच उपाय असल्याचे डॉक्टर सांगतात. विशेष म्हणजे ‘बीसीजी’ आणि इतर लसीकरणामुळे लहानग्यांवर कोरोना विषाणूचा फार प्रादुर्भाव जाणवत नाही, मात्र त्यांच्या संपर्कात येणारे ज्येष्ठ नागरिक आणि घरातील इतर सदस्य कोरोनाबाधित होऊ शकतात. 

संबंधित बातम्या