राज्यात कोरोनाचे चोवीस तासांत ८ बळी; फोंडा, पर्वरी, साखळी कोरोनाचे हॉटस्‍पॉट

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

आज ४७३ जणांची प्रकृती सुधारल्‍यामुळे त्‍यांना घरी पाठविण्‍यात आले. तर ३९४ जण घरगुती अलगीकरण करून उपचार घेत आहेत. तसेच राज्यात एकूण ५ हजार १०४ सक्रिय रुग्ण आहेत.

पणजी: राज्यात मागील चोवीस तासांत ८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे राज्यातील आत्तापर्यंतची बळींची संख्या २७६ वर पोहोचली आहे. तर फोंडा, पर्वरी आणि साखळी येथील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ते हॉटस्पॉट बनू लागले आहेत.

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज २ हजार ३५४ जणांच्या चाचण्या घेतल्या गेल्या. त्यात ५५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, १ हजार २९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ५०४ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. आज ४७३ जणांची प्रकृती सुधारल्‍यामुळे त्‍यांना घरी पाठविण्‍यात आले. तर ३९४ जण घरगुती अलगीकरण करून उपचार घेत आहेत. तसेच राज्यात एकूण ५ हजार १०४ सक्रिय रुग्ण आहेत. त्याचबरोबर जे आठजण दगावले आहेत, त्यात फोंडा येथील ५३ वर्षीय महिला, पर्रा येथील ४६ वर्षीय पुरुष, मळा-पणजी येथील ७९ वर्षीय पुरुष, मडगाव येथील ७४ वर्षीय पुरुष, आगशी येथील ४५ वर्षीय पुरुष , केपे येथील ४४ वर्षीय महिला, बायणा येथील ४१ वर्षीय पुरुष आणि फोंडा येथील ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

आणखी वाचा: गृह अलगीकरण रुग्‍णांना ‘कोविड किट’: आरोग्‍यमंत्री राणे

मडगाव आरोग्य केंद्राच्या पाठोपाठ आता रुग्णसंख्येच्याबाबत फोंडा, साखळी आणि पर्वरी ही ठिकाणे हॉटस्पॉट बनू पाहत आहेत. या ठिकाणची रुग्णसंख्या ३००च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे या भागावर विशेष लक्ष्य आरोग्य खात्याला द्यावे लागणार आहे. 

पेडणे तालुक्यातील विविध भागात आज १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. डिचोलीत आज दिवसभरात १७, मये विभागात १७ आणि साखळी विभागात २ मिळून तालुक्यात ३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शुक्रवारी डिचोली विभागात २१६ मये विभागात २१२ आणि साखळी विभागात ११६ मिळून तालुक्यात एकूण ५४४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 

काणकोणात आज ७ पॉझिटिव्‍ह सापडले. आज सापडलेले रुग्‍ण खोला पंचायत क्षेत्रातील आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या