Cyclone tauktae Effects on goa
Cyclone tauktae Effects on goa

Cyclone Tauktae: चक्रीवादळाचा राज्याला मोठा फटका...पहा ग्राउंड रिपोर्ट

                                                                                                पणजी: केरळहून गोव्यात (Goa) सुमारे 147 कि. मी. वेगाने धडकलेल्या ‘तौकते’ (Cyclone Tauktae)चक्रीवादळाने राज्याला आज मोठा तडाखा देत हाहाःकार माजवला. दिवसभरात सोसाट्याचा वादळीवारा व धुवांधार पावासामुळे 500 हून अधिक मोठी व लहान झाडे उन्मळून पडली, तर 150 घरांवर झाडे पडून तसेच छप्पर उडून नुकसान झाले. बार्जेस भरटकल्या, रस्त्यावर झाडे पडल्याने अनेक भागात वाहतूक ठप्प झाली. वीज खांब मोडून पडण्याबरोबरच वीजवाहिन्यांवर झाडे पडून राज्यातील अनेक भागात वीजप्रवाह खंडित झाला. दोन घटनांमध्ये दोघाजणांचा मृत्यू झाला, तर पाचजणांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी इस्पितळात दाखल केले आहे. हे चक्रीवादळ गोव्याकडून पुढे सरकले असले तरी वाऱ्याचा व पावसाचा जोर दोन दिवस कायम राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. रस्त्यावरील झाडे बाजूला करण्याचे व वीजप्रवाह सुरळीत होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत.(Ground report: of the situation created by the storm)

राज्यातील किनारपट्टी भागाला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे राज्याच्या प्रत्येक तालुक्यात नुकसान झाले असले तरी बार्देश व मुरगाव तालुक्याला मोठा तडाखा बसला आहे. महालवाडा - हणजूण येथे शितल पाटील या तरुणीच्या डोक्यावर माड पडून तिचा जागीच मृत्यू झाला. ही तरुणी आपल्या घराच्या मागील बाजूला असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात होती, तर माशेल येथे दोघे तरुण स्कूटरवरून जात असताना विजेचा खांब अचानक त्यांच्यावर पडला व त्यात ते जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारास नेत असताना वाटेतच निधन झाले. मुरगाव येथे काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेथे एका घरावर झाड पडल्याने चौघेजण जखमी झाले. त्यांना उपचासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. उभ्या करून ठेवलेल्या वाहनांवर झाडे पडण्याचे प्रकार घडले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या वादळामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याबरोबरच झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या. राष्ट्रीय महामार्गावर तसेच शहरी व अंतर्गत रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली. काल रात्रीपासूनच वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. कालपासून गोव्यात तैनात असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापनची ‘एनडीआरएफ’ पथक मुरगाव भागात घरांवर पडलेली झाडे हटविण्याचे व किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम करत आहे. त्यांचे हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्याने नौदलाचीही मदत घेतली आहे.    

कोविड इस्पितळांवर परिणाम नाही 
राज्यात झालेल्या खंडित वीजप्रवाहाचा कोविड इस्पितळात कोणताही परिणाम झाला नाही. या इस्पितळांना ‘पावर बॅकअप’ची  सोय असल्यामुळे तसेच नव्याने गोमेकॉ इस्पितळात प्राणवायू टाकी सुरू केल्याने धोका टळला. काही वेळ गोमेकॉ इस्पितळात व प्राणवायू प्रकल्पात वीज खंडित झाली. मात्र, त्वरित ती सुरू करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली.    

मदत निधीचे सरकारचे आश्‍वासन 
चक्रीवादळामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. तसेच दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांना आपत्कालीन व्यवस्थापन मदत निधीतून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी संबंधित तालुका उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. हा निधी येत्या आठ दिवसांत देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

कुठे किती  पाऊस झाला ?

पणजी       -    124     

म्हापसा      -     149 
जुने गोवे     -     139
पेडणे         -     75
मुरगाव       -     59.8 
                                                                  दरम्यान, राज्यात  निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोलताना  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपत्कालीन व्यवस्थापन मदत निधीतून नुकसान भरपाई देणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यानुसार पुढच्या तीन दिवसात  नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आलेले आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com