गोव्यातील आमठाणे धरण फुल्ल; पण मगरीचा वावर असल्याने भीती

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

मगरींच्या संचारामुळे असुरक्षित बनलेल्या आमठाणे धरणावर पर्यटकांचा अतिउत्साह वाढतच असून धोका असतानाही पर्यटकांकडून पुन्हा पाण्यात उतरण्याचे प्रकार चालू झाले आहेत.

डिचोली: मगरींच्या संचारामुळे असुरक्षित बनलेल्या आमठाणे धरणावर पर्यटकांचा अतिउत्साह वाढतच असून धोका असतानाही पर्यटकांकडून पुन्हा पाण्यात उतरण्याचे प्रकार चालू झाले आहेत. काल रविवारी सायंकाळी या धरणावर पर्यटकांच्या अतिउत्साहाचा प्रत्यय येतानाच काही लहान मुले चक्‍क पाण्यात खेळताना आढळून येत होते. 

मगरीच्या हल्ल्यात एका युवकाचा बळी गेल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी जलसंसाधन खात्यातर्फे या धरणस्थळी धोक्‍याची सूचना देणारे फलक उभारण्यात आलेले आहेत. फलक उभारल्यानंतर सुरवातीचे काही दिवस या धरणावर काहीसा शुकशुकाट दिसून येत होता. या धरणावरील मुक्‍त वावरावर काहीसे नियंत्रण आले असल्याचे वाटत असतानाच, आता पुन्हा एकदा पर्यटकांचा वावर वाढत आहे. त्यातच काही पर्यटकांकडून धरणातील पाण्यात उतरण्याचे प्रकार घडत असल्याने धोका निर्माण झाला आहे.

गोवाः त्या घटनेमुळे कोलवाळ कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेत बदल 

जिवितहानीसारखी पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने या धरणावर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक बनले आहे. तशी प्रतिक्रियाही जागृत नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे. मेणकुरे पंचायत क्षेत्रात निसर्गाच्या सान्निध्यात असलेले आमठाणे धरण हे मागील काही वर्षांपासून पर्यटकांना आकर्षित करीत आहे. स्थानिकांसह देशी पर्यटकही सौंदर्य न्याहळण्यासाठी या धरणाला भेट देतात. अधूनमधून विदेशी पर्यटकही या धरणावर येतात अशी माहिती मिळाली आहे. सुटीच्या दिवसात तर या धरणावर मजा लुटण्यासाठी तरुणाईसह पर्यटकांची गर्दी उसळते.

ऐन उन्हाळ्यात धरण ‘फूल्ल’!

दरवर्षी साधारण मार्च-एप्रिल महिन्यात आमठाणे धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाली की पाण्याचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासाठी जलस्त्रोत खात्यातर्फे शापोरा नदीवरील साळ येथील बंधाऱ्यातून या धरणात पाणी सोडण्यात येते. मागील जानेवारी महिन्यात दोडामार्ग भागात तिळारीच्या कालव्याला भगदाड पडल्यानंतर पाणी समस्या नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने आमठाणे धरणातून अस्नोडा जलशुध्दीकरण प्रकल्पात पाणी पुरवठा करावा लागला. त्यामुळे आमठाणे धरणातील पाणी नियंत्रित ठेवण्याचे काम मागील जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाले. 
सध्या या धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असून हे धरण पावसाळ्यातील दिवसांप्रमाणे फूल्ल असल्याचे दिसून येत आहे.

धरण असुरक्षित
या धरणात मगरींचा संचार असल्याने धरणातील पाण्यात उतरणे धोकादायक बनले आहे.  मागील 1 जानेवारी रोजी नववर्ष साजरे करण्यासाठी या धरणावर आलेल्या राजस्थानमधील पर्यटक गटातील युवकांचा धरणात बुडाल्याने बळी गेला होता. धरणात आंघोळीची मजा लुटताना या युवकावर मगरीने हल्ला केल्याने त्याचा दुर्दैवीरित्या अंत झाला होता. या घटनेनंतर धरणातील पाण्यात मगरींचा संचार असल्याचे स्पष्ट झाल्याने या धरणातील पाण्यात उतरणे असुरक्षित आणि जीवघेणे बनले आहे. मगरींच्या संचारामुळे पाण्यात उतरणे धोकादायक असल्याची सुचना देणारे फलक जलसंसाधन खात्याने धरणस्थळी उभारले असतानाही काही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करून पाण्यात उतरत असतात. काही पर्यटक आपल्या लहान मुलांना घेवून या धरणावर येतात. बऱ्याचदा लहान मुले पाण्यात उतरून मजा लुटनाता दिसून येत असल्याची माहिती मिळाली आहे. 
 

संबंधित बातम्या