कोरोनाचा उच्चांक; 24 तासात 2293 नव्या रुग्णांची नोंद

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

राज्यात आज सर्वाधिक 2293 कोरोना रुग्ण सापडले. तसेच विविध इस्पितळात कोरोनावर उपचार घेणाऱ्या 24 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. गेल्या वीस दिवसांत राज्यात तब्बल 10831 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर वीस दिवसांत कोरोनामुळे तब्बल 177  व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले.

पणजी : राज्यात आज सर्वाधिक 2293 कोरोना रुग्ण सापडले. तसेच विविध इस्पितळात कोरोनावर उपचार घेणाऱ्या 24 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. गेल्या वीस दिवसांत राज्यात तब्बल 10831 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर वीस दिवसांत कोरोनामुळे तब्बल 177  व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. तसेच एकूण मृतांची संख्या1017  वर पोहोचली आहे. म्हापसा येथील 25  वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या पाहता लोकांनी सावधगिरी बाळगावी, सुरक्षा नियमांचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा, गरज असल्यासच घराबाहेर पडावे, गर्दीची ठिकाणे टाळावीत, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. (The height of the corona; 2293 new patients registered in 24 hours) 

सर्वण पंचायत पोटनिवडणुकीत अजास खान विजयी

देशभरातच कोरोनाचा उद्रेक वाढत असताना गोव्यातही तो फैलावत आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या १७  व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ मडगाव येथे उपचार घेणाऱ्या 7  अशा एकूण 24  व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. आजच्या 24  कोरोना बळीमुळे राज्यात कोरोनाबळीने एक हजाराचा आकडा पार केला व आज बळींची संख्या १०१७  वर पोहोचली आहे. 

विक्रमी पाच हजार 
कोरोना तपासणी चाचणी 
आज दिवसभरात पहिल्यांदाच पाच हजाराच्यावर (5946) कोरोना नमुने तपासण्यात आले. त्यात 2293 कोरोनाचा संसर्ग झालेले सापडले.  या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे राज्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 13689 झाली. यापूर्वी ता. 20 एप्रिल रोजी सर्वाधिक26 व्यक्ती एका दिवसात कोरोनामुळे मृत झाल्या होत्या. मात्र, एका दिवसात दोन हजारांवर (2293) नवे कोरोना संसर्गीत सापडण्याची घटना आज पहिल्यांदाच घडली आहे. यापूर्वी एका दिवसात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण (ता.24  एप्रिल)1540  सापडले होते. राज्यात कोरोनाचे संकट आल्यापासून आज सापडलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

कोरोना साखळी तोडणे अत्यावश्यक
आज सापडलेले नवे कोरोनाबाधित व कोरोनामुळे गेलेल्या बळींची संख्या पाहता राज्य सरकारला आता कोरोनाच्या नियंत्रणासाठी कठोर  निर्णय घ्यावे लागणार आहेत. रात्रीची संचारबंदी कोरोना फैलावाची साखळी नियंत्रणात आणण्यासाठी पुरेसे नाही. परराज्यातून गोव्यात येणाऱ्यांवर काही दिवस पूर्ण बंदी घालणे किंवा त्यांना कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र सक्तीचे करणे, लग्न सोहळे, जत्रा यांना होणारी गर्दी नियंत्रणात ठेऊन बाजार, बसस्थानक आदी ठिकाणी सुरक्षित अंतर व तोंडाला मास्क आदी नियमांची अंमलबजावणी कठोरपणे करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस लॉकडाऊनच्या धर्तीवर कडक प्रतिबंध गरजेचे आहेत. पेक्षा आर्थिक स्थिती सावरण्याच्या नादात कोरोनाचा फैलाव नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. 

658 जणांच्या प्रकृतीत सुधार
आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार कोरोनावर उपचार घेणारे 658 जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, कोरोना संसर्गाची टक्केवारी 38.56 टक्के पर्यंत वाढली. पर्वरी, कांदोळी, फोंडा, पणजी, मडगाव, शिवोली, धारगळ, साखळी या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात सर्वांत जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

मडकईकर यांनी घेतली लस
पणजीचे माजी महापौर व नगरसेवक उदय मडकईकर यांनी आज ता.25 रोजी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे राज्यातील 45 वर्षांवरील सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, आवाहन  मडकईकर यांनी केले.

भाटले, तांबडीमाती, सांतिनेज, करंजाळे नॅनो कंटेन्मेंट झोन
व विधानसभा मतदारंसघातील भाटले, तांबडीमाती, सांतिनेज, करंजाळे व व्हडले भाट या भागातील ज्या इमारतीमध्ये दोनपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत, त्या इमारती सुक्ष्म प्रतिबंधक विभाग (नॅनो कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी तथा आपत्कालीन यंत्रणेचे प्रमुख अजित रॉय यांनी काढलेल्या आदेशानुसार या इमारती सुक्ष्म प्रतिबंधक विभाग म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. रॉय यांनी काढलेल्या आदेशानुसार भाटले येथील राममंदिर परिसरातील दत्ता अपर्टमेंट व साईप्रसाद अपार्टमेंट, तांबडीमाती, सांतिनेज येथील मधुबन कॉप्लेक्स इमारत सी व डी, करंजाळे येथील मॉडेल इस्टेट इमारत क्रमांक 1  व व्हडलेभाट येथील सिद्धिविनायक सोसायटी घर क्रमांक सी 16/146/1 ही ठिकाणे सुक्ष्म प्रतिबंधक विभाग म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. आज ताळगावच्या आमदार व महसूल मंत्री जेनिफेर मोन्सेरात यांनी स्थानिक नगरसेवक उदय मडकईकर यांना सोबत घेऊन राम मंदिर परिसराचे निर्जंतुकीकरण केले. अग्निशामक दलाने येथे फवारणी केली. दरम्यान मिरामार येथील पर्यटन खात्याची मिरामार रेसिडेन्सी आपत्कालीन कायद्याखाली राखून ठेवण्याची सूचना अजित रॉय यांनी पर्यटन खात्याला केली आहे.

लसीकरण 3 लाखांकडे
मोहिमेत आज (ता.25) 4077एवढे लसीकरण  झाले. सध्या पंचायत पातळीवरील टीका उत्सव अंतर्गत लसीकरण बंद असल्याने फक्त सरकारी व खासगी इस्पितळात 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू आहे. आज सरकारी व खासगी  इस्पितळात मिळून 4077एवढे लसीकरण  झाले. त्यामुळे राज्यातील लसीकरणाची संख्या 2  लाख 96 हजार हजार 477 एवढी झाली आहे. यात 233866 जणांनी लसीचा पहिला डोस, तर 62611  जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

संबंधित बातम्या