म्हापशात विक्रेत्यांनी व्यवसाय थाटल्यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड

Mapusa market
Mapusa market

म्हापसा : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने राज्यात संचारबंदी लावल्यानंतर पालिका बाजार, मासळी, भाजी व फुलांचा बाजार म्हापसा पालिकेने बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, पालिका मंडळ प्रशासकीय अधिकारी व म्हापसा पोलिस यांच्या आशीर्वादाने म्हापसा अर्बन बॅंकेसमोरील रस्त्यावर बाजार सुरू आहे. दररोज सकाळी 6 ते दुपारी 1 वा.पर्यंत या नवीन बाजारात खरेदीसाठी झुंबड असते. म्हापसा शहरात कोरोनाच्या फैलावाचे ठिकाण या स्थळावर होत आहे. 

मागच्या आठ दिवसांपासून म्हापसा पालिका बाजारपेठ खुली करण्यास पालिकेने परवानगी दिली. पण, म्हापसा पालिका भाजी, मासळी व फुलांचा बाजार खुला करण्यास परवानगी पालिकेने नाकारली. ही बाजारपेठ चालू केल्यास म्हापशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढणार आहे. हा जावईशोध पालिका मंडळाने लावला. या ठिकाणी व्यवसाय करणारे सामान्य व गरीब विक्रेते आहेत. या बाजारात व्यवसाय करणाऱ्यांची तिसरी पिढी आहे. ही मंडळी दररोज कमवून खाणारी आहे. पण, कोरोनाच्या नावाखाली पालिका मंडळाकडून सतावणूक होत आहे. 

एक हजारपेक्षा अधिक विक्रेते 
म्‍हापशात एक हजारापेक्षा जास्त विक्रेते भाजी, मासळी व फुलांच्या बाजारात आपला वर्षानुवर्षे व्यवसाय करून आपले कुटुंब सांभाळतात. मागच्या ५० दिवसांपासून ही मंडळी बेकार आहेत. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. पण, पालिकेच्या आशीर्वादाने कोरोनाच्या काळात नवीन विक्रेते तयार करण्यात आले. भाजी, मासळी व फुलांचा बाजार सुरू केल्यास कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे, असा सूर लावला जात आहे. पण, म्हापसा अर्बन बॅंकेसमोर दररोज ग्राहक झुंबड करीत आहेत. या गर्दीवर नियंत्रण आणण्यास पालिका व पोलिसांना पूर्णपणे अपयश आले आहे. अशाच प्रकारे सिने अलंकार जवळील काही गाडे बेकायदेशीरपणे चालू आहेत. काही गाडे रात्री १२ वाजेपर्यंत चालू असतात. पण, पोलिस व पालिका या गाडेधारकांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न म्हापसावासीयांना पडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com