वझरीवासीयांचा आता मुक्तीसाठी एल्गार

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

गोवामुक्तिचा हिरक महोत्सव साजरा होत आहे. पेडणे तालुक्यातील वझरी गांव मात्र अद्यापही मुक्त झालेला नाही.

पणजी: गोवामुक्तिचा हिरक महोत्सव साजरा होत आहे. पेडणे तालुक्यातील वझरी गांव मात्र अद्यापही मुक्त झालेला नाही. वझरी गावावर पोर्तुगीज काळापासून कोर्ट रिसिव्हर नामक सालाझाराची सत्ता आहे. ही सत्ता उलथवून वझरीवासीयांना मुक्त करण्याचे आवाहन करण्यासाठी वझरीवासीयांनी शुक्रवारी गोवा मुक्तीच्या पूर्वसंध्येला गावांत मशाल मिरवणुकीचे आयोजन केले आहे. 

वझरी शेतकरी नागरिक कृती समितीतर्फे या मशाल मिरवणुकीची हाक दिली आहे. समस्त वझरी गावातील ग्रामस्थांनी या हाकेला साद देत मोठ्या प्रमाणात या मशाल मिरवणुकीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. गोवा मुक्तिपूर्व १९४५ साली वझरी गावात कोर्ट रिसिव्हरच्या अन्यायाविरोधात मोठे शेतकरी आंदोलन झाले होते. यानंतर गोवा मुक्त होऊन आता ५९ वर्षे पूर्ण झाली. वझरीवासीय आपल्या पद्धतीने या प्रकाराविरोधात लढा देत आहेत. परंतु शासकीय व्यवस्था वझरीवासीयांना दाद न देता उघडपणे कोर्ट रिसिव्हरची बाजू घेत असल्याचा आरोप वझरीवासीयांनी केला आहे. 

पेडणेच्या संयुक्त मामलेदार गौतमी परमेकर यांच्याकडे कोर्ट रिसिव्हरच्या वंशजांकडून बेकायदा म्यूटेशन अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांवर सुनावणी सुरू असताना शेतकरी समितीने या अर्जांना हरकत घेतली आहे. या अर्जांच्या सुनावणीवेळी गौतमी परमेकर यांच्याकडून वझरीवासीयांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याची टीका निलेश शेटये यांनी केली आहे. वझरीचा संपूर्ण गांव कोर्ट रिसीव्हरच्या नावे लागला आहे. गेल्या अनंत काळापासून वझरी गांव वसवून तिथे अनेक पिढ्या घडल्या. पण या पिढ्यांच्या नावे ना शेती ना बागायती अशी परिस्थिती आहे. संपूर्ण वझरी गांवची मालकी कोर्ट रिसिव्हरकडे आहे तर मग वझरीवासीय कुठून आभाळातून टपकले की काय,असा सवाल नीलेश शेटये यांनी केला आहे. पोर्तुगीज राजवटीत जमनीच्या मालकीसंबंधी फेरफार करून हा गाव आपल्या नावे लावण्यात आला. ही सगळी कागदपत्रे पोर्तुगीज आणि मोडी भाषेत आहे. गरीब, अशिक्षित वझरीवासीयांना याबाबत काहीच माहिती नसल्याने सरकारी अधिकाऱ्यांकडे संधान साधून संपूर्ण वझरी गांव कोर्ट रिसिव्हरने आपल्या कब्जात घेतल्याचा आरोप समितीने केला आहे.

 
आता ही सालाझारशाही मोडून काढण्याचा निर्धार वझरीवासीयांनी केला आहे. यासंबंधी संपूर्ण वझरी गांव एकत्र आला आहे. कोर्ट रिसिव्हरच्या वंशजांकडून काही ग्रामस्थांना लालुच दाखवून गावांत फुट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. या सगळ्या अत्याचार आणि अन्यायाला आता वझरीचे ग्रामस्थ कंटाळले असून कोर्ट रिसिव्हरच्या जुल्मातून वझरीची सुटका करून घेण्यासाठी प्रसंगी प्राण पणाला लावण्याचा निर्धार त्यांनी केल्याचेही शेटये यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वझरीतील कोर्ट रिसिव्हर प्रकरणाची संपूर्ण माहिती देणारे निवेदन साद केले आहे. त्यांनी तत्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून वझरी गावाला मुक्ती मिळवून द्यावी. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात वझरीचा विषय उपस्थित झाला होता परंतु तो सुटू शकला नाही. आता डॉ. प्रमोद सावंत यांना वझरीची मुक्तता करण्याची संधी चालून आली आहे. वझरीला कोर्ट रिसिव्हरच्या जाचातून मुक्त करून त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या नेतृत्वाची सिद्धता करावी,असे आवाहन शेतकरी समितीने केले आहे.

आणखी वाचा: 

स्वातंत्र्य मिळालेला गोवा कसा बदलला ; ६०व्या गोवा मुक्तिदिनानिमित्त घेतलेला आढावा -

 

संबंधित बातम्या