राष्ट्रपतीच्या स्वागतासाठी राजधानी नटली

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

साठाव्या मुक्तिदिनानिमित्त राष्ट्रपती १९ रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ते मुख्य कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असल्याने निम्मी या राजधानी त्यांच्या स्वागतासाठी नटली आहे.

पणजी: साठाव्या मुक्तिदिनानिमित्त राष्ट्रपती १९ रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ते मुख्य कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असल्याने निम्मी या राजधानी त्यांच्या स्वागतासाठी नटली आहे. कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणचा परिसर आणि ज्या मार्गावरून ते ये-जा करणार आहेत, त्या रस्त्यांचे रुपडेच पालटले आहे. 

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी निम्म्या पणजीला सजवले जात आहे. उर्वरित भागात मात्र अजूनही रस्त्यांवर खड्डेच दिसत आहेत. राष्ट्रपती येणार आहेत आणि त्यामुळे कित्येक वर्षांतून आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाची डागडुजी सुरू झालेली आहे. दोन दिवसांवर मुक्ती दिनाचा कार्यक्रम येऊन ठेपल्याने महापालिकेनेही आपल्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. गटारे, रस्ते स्वच्छतेवरही त्यांनी भर दिला आहे. 

कवायत मैदानावर असलेला प्लास्टिक कचराही तत्काळ कर्नाटकातील सिमेंट कारखान्याला हटविण्यात येत आहे. गेली दोन दिवसांपासून येथील कचरा हटविण्याचे काम सुरू झाले आहे. कवायत मैदानाची स्वच्छतेचे कामही महापालिका करीत असून, रस्त्याच्या बाजूची दगडांनाही काळे-पांढरे पट्टे मारण्याची घाई सुरू झालेली आहे. दोन दिवसांवर कार्यक्रम येऊन ठेपला असला तरी अद्याप सिग्नलच्या चाचण्या सुरू झालेल्या नाहीत. त्याशिवाय सांतिनेज येथे उभारलेल्या सिग्नल यंत्रणेसाठी वीज वाहिन्या नेण्याकरिता खोदकाम केलेली जागाही व्यवस्थित केलेली नाही.

अजूनही चौकातील पेव्हर्स उखडलेलेच आहेत. याठिकाणाहून सरकारी अधिकारी ये-जा करतात, त्यांना अलिशान गाडीतून काही समजत नसेल, पण दुचाकीधारकांना त्याचा त्रास होत असतो. एका बाजूला काही भाग चकचकीत केला गेला आहे, तर दुसरीकडे रस्त्यांच्या दूरवस्थेकडे लक्षही नाही असा प्रकार स्पष्टपणे दिसत आहे.

आणखी वाचा:

गोवा मुक्तिदिन सोहळा वर्षभर साजरा करणार: मुख्यमंत्री -

संबंधित बातम्या