पणजी कला अकादमीत आयोजित केला जाणारा स्वरमंगेश महोत्सव यंदा रद्द

दैनिक गोमंतक
शनिवार, 5 डिसेंबर 2020

दरवर्षी डिसेंबर महिन्यात पणजी कला अकादमीत आयोजित केला जाणारा स्वरमंगेश संगीत व नृत्य महोत्सव यावर्षी केला जाणार नाही.

पणजी ; दरवर्षी डिसेंबर महिन्यात पणजी कला अकादमीत आयोजित केला जाणारा स्वरमंगेश संगीत व नृत्य महोत्सव यावर्षी केला जाणार नाही. स्वस्तिक आयोजित स्वरमंगेश महोत्सव हा गोमंतकीय प्रतिभावान कलाकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना अर्पित केलेला आहे. अल्पावधित देशभरात लोकप्रिय झालेला हा महोत्सव असून ज्याचे उद्घाटन २०११ साली भारतरत्न लता मंगेशकर यांच्या शुभहस्ते झाले होते. 

गेली नऊ वर्षे सलग हा महोत्सव आयोजित केला गेला असून, देशातील नामवंत तसेच तरूण प्रतिभाशाली कलाकारांनी आपली कला पेश केलेली आहे. ह्या महोत्सवाची खासियत म्हणजे, ह्यात शास्त्रीय गायन, वादन व नृत्य असे तिन्ही कलाविष्कार सादर केले जातात. ह्या महोत्सवात पं. राजन व साजन मिश्रा, पं. अजय चकवर्ती, उस्ताद रशीद खाँ, उस्ताद शाहिद परवेझ, पं. कुमार बोस, पं. भवानी शंकर, पं. नयन घोष, पं. उल्हास कशाळकर, उस्ताद अक्रम खाँ, पं. योगेश समसी, शुभंकर बॅनर्जी, प्रवीण गोडखिंडी, पुरबायन चॅटर्जी, कौशिकी चकवर्ती, ओजस आधिया, रवींद्र चारी, पं. शौनक अभिषेकी, मंजुषा कुलकर्णी, राहुल देशपांडे, भरत बळवल्ली, सावनी शेंडे, शाश्वती मंडळ, सुचिस्मिता दास, राजेंद्र व निरूपमा, मनिषा मिश्रा, संगीत मिश्रा, विशाल कृष्णा, रूद्र शंकर मिश्रा, गुलाम नियाज खाँ, रूपा पनेसर, प्रिया पुरूषोत्थमन, इशान घोष, योगराज नाईक, प्रवीण गावकर, समीक्षा भोबे, स्वराली पणशीकर, गोविंद भगत, हेतल गंगानी, संगीता अभ्यंकर, रूपा च्यारी, देष कोसंबे, राया कोरगांवकर, सुभाष फातर्पेकर, दत्तराज म्हाळशी, अमर मोपकर, दत्तराज सुर्लकर, मयंक बेडेकर, चिन्मय कोल्हटकर अशा अनेक कलाकारांने आपली कला सादर करून या महोत्सवाची शान वाढविली आहे. ह्या महोत्सवात दर वर्षी सारंगी वादन ठेवून हे दुर्मिळ वाद्य जीवंत ठेवण्याचा मानस आयोजकांचा असतो.

त्याचबरोबर ह्या महोत्सवादरम्यान संगीत वाद्य व संगीत पुस्तकं यांचं प्रदर्शन पण भरवलं जातं. अशा सर्वांगसुंदर महोत्सवाची रसिक व कलाकार आतुरतेने वाट बघत असतात. ह्या महोत्सवात देश-विदेशातील लोक आवर्जून हजेरी लावतात. ह्या महोत्सवाच्या आयोजनात कला अकादमी गोवा व गोवा कला व सांस्कृतिक खाते यांचाही महत्वाचा सहभाग असतो.
ह्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आयोजकांनी हा महोत्सव आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी परिस्थिती निवळली तर मोठ्या जोमाने आणि कल्पकतेने स्वरमंगेश महोत्सव सादर केला जाणार आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या