कोविडमुळे गोवा पर्यटन क्षेत्राला मोठा फटका

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

पर्यटन उद्योगाला सुमारे २ हजार ते ७ हजार २०० कोटींचे नुकसान झाले आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) आणि केपीएमजी यांच्या मदतीने गोवा पर्यटनने केलेल्या सर्वेक्षणात हे उघड झाले आहे.

पणजी; राज्यातील कोविड महामारीचा सर्वात मोठा फटका पर्यटन उद्योगाला बसला आहे. तसेच सुमारे ३५ ते ५८ टक्के जणांना नोकऱ्या गमावण्याची पाळी आली आहे. पर्यटन उद्योगाला सुमारे २ हजार ते ७ हजार २०० कोटींचे नुकसान झाले आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) आणि केपीएमजी यांच्या मदतीने गोवा पर्यटनने केलेल्या सर्वेक्षणात हे उघड झाले आहे. या सर्वेक्षण अहवालाच्या पुस्तिकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. 

‘कोविड - १९ शी सामना गोवा पर्यटन उद्योगाचे अस्तित्व आणि पुनरुज्जीवन’ या अहवाल सर्वेक्षण पुस्तिकाचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री बाबू आजगावकर, पर्यटन विकास महामंडळाचे दयानंद सोपटे, मुख्य सचिव परिमल राय, मुख्यमंत्र्यांचे सचिव अशोक कुमार, पर्यटन संचालक मिनिनो डिसोझा उपस्थित होते. पर्यटन क्षेत्रातील सुमारे ६०० विविध घटकांना सामावून घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोरोन महामारीमुळे देशातील सर्व राज्यांच्या पर्यटन उद्योगावर परिणाम झाला आहे. या सर्वेक्षणात पर्यटन क्षेत्राचे झालेले नुकसान व त्यावर मात करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या काही सूचना त्यामध्ये मांडण्यात आल्या आहेत. पर्यटनाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यापुरत्या सूचनांबरोबर हे पर्यटन क्षेत्र कशाप्रकारे मजबूत करण्यात येईल यावरही भर देण्यात आला आहे. राज्यातील ३५ टक्के लोक हे पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यटन उद्योग क्षेत्राचे गोव्यातील राज्य सखल उत्पादनाचे प्रमाण १६.४३ टक्के आहे. 

गोवा पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणात १० एप्रिल २०२० ते २५ मे २०२० पर्यंत कोरोना महामारीमुळे पर्यटन उद्योगातील विविध घटकांवर झालेल्या परिणामांचा तसेच नुकसानीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये तारांकित हॉटेल्स व गेस्ट हाऊस, शॅक्स ते टॅक्सी व्यवसाय तसेच पर्यटन उद्योगावर अवलंबून असलेल्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. पर्यटन क्षेत्राला चालना देताना राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हॉटेल्सची नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना कोविड मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यास सक्ती करण्यास सरकारला सोपे होणार आहे. 

आणखी वाचा:

..आणि उगवला ‘सोनियाचा दिन’ ; थरारानंतर गोवा मुक्तिदिनाची पहाट -

 

संबंधित बातम्या