गोवा: कोरोना नियम धाब्यावर; उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांचा डान्स होतोय व्हायरल पहा VIDEO

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याने सरकारने हल्लीच कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

पणजी: राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याने सरकारने हल्लीच कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लग्नसोहळा व इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी 50 टक्क्यांपेक्षा उपस्थिती असू नये असे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर हे गर्दी असलेल्या मडगावात एका कार्यक्रमात नृत्य करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकप्रतिनिधी असूनही त्यांनी केलेल्या या उल्लंघनाबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला आहे. (Watch video: Goa deputy CM dances at wedding function, flouts COVID-19 rules)

कोरोना रुग्णांसाठी राज्यात अत्याधुनिक दोन हजार खाटा उपलब्ध करून देणार:  ...

सरकार लोकांनी कायद्यानुसार व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करते तर जे कायदे व नियम करतात ते लोकप्रतिनिधी स्वतःच पाळत नाहीत. कायदा हा सर्वांसाठी समान असतो. मात्र त्यामध्ये भेदभाव केला जातो हे या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्यात आली की नाही तसेच घेतली असल्यास त्यामध्ये त्यांनी निर्बंध घालून ती दिली असणार. मग त्याचे उल्लंघन झाल्यावर स्थानिक पोलिसांनी कारवाई का केली नाही हा प्रश्न उपस्थित होतो. जर हा कार्यक्रम एखाद्या सामान्य व्यक्तीने केला असता तर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन बंद पाडला असता.

मात्र, पोलिसांना आजगावकर हे नृत्य करत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तो बंद करण्याचे धाडस झाले नाही. यावरून सामान्य व श्रीमंतांना नियम लावताना भेदभाव केला जातो हे या व्हिडिओवरून दिसून येत आहे. ‘शो मास्ट गो ऑन’ अशी घोषणा करणारे राज्याचे एक मंत्री कोरोना मार्गदर्शक सूचनांचे निर्बंध डावलून एका कार्यक्रमात नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हॉटस्अप व्हायरल झाला आहे. 

लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण’
स्वतःच लोकप्रतिनिधी नियमांचे उल्लंघन करत आहेत. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण’ अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. लोकप्रतिनिधी स्वतः नियम पाळत नसल्यास लोकांना ते पाळण्याचे आवाहन करण्याचा अधिकार राहत नाही असे ते म्हणाले. दरम्यान, या व्हायरला झालेल्या व्हिडिओबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर हे कार्यक्रमात नृत्य करत असलेला व्हिडिओ पाहिलेला नाही. मी हा व्हिडिओ पाहिल्यावर उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्याशी या प्रकरणासंदर्भात सवाद साधू असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या