राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ जूनपासून सुरू

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठास जूनपासून सुरुवात होईल आणि त्यात सुरुवातीस तीन अभ्यासक्रमांचा समावेश असेल,

मुंबई: राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठास जूनपासून सुरुवात होईल आणि त्यात सुरुवातीस तीन अभ्यासक्रमांचा समावेश असेल, असे सांगतानाच राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलाचा पुरेसा उपयोग होत नाही. क्रीडा विद्यापीठाद्वारे तेथील सुविधांचा पुरेसा उपयोग करून घेतला जाईल, असेही सांगितले.

देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात जूनपासून तीन स्पोर्टस्‌ सायन्स, स्पोर्टस्‌ टेक्‍नॉलॉजी आणि स्पोर्टस्‌ ट्रेनिंग या विषयावरील अभ्यासक्रम सुरू होतील. या तीनही विभागांत सुरुवातीस पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. आम्ही प्रत्येक विभागास किती कालावधी असेल हे निश्‍चित केलेले नाही. तो सहा महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत असेल, असेही केदार यांनी सांगितले.

एक यशस्वी खेळाडू घडवण्यासाठी सुमारे दीडशे व्यक्तींची मेहनत लागते. त्यामुळेच या विद्यापीठात खेळाविषयक सर्व बाबींचे प्रशिक्षण असेल, आम्ही यापूर्वी जे काही उपक्रम झाले, त्याबाबत अभ्यास करूनच हे विद्यापीठ सुरू करीत आहोत. त्यामुळे याबाबतचे विश्‍लेषण लगेच न करता एका वर्षांनी केल्यास योग्य होईल, असेही ते म्हणाले.

क्रीडा विद्यापीठ औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा विचार होता, पण तेथील जागा कमी होती. त्यापेक्षाही बालेवाडीतील क्रीडा संकुलाचा पुरेसा उपयोग झालेला नाही. त्याचा पूर्ण क्षमतेने उपयोग करण्याचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा:

एफसी गोवासमोर चेन्नईयीनचे खडतर आव्हान -

संबंधित बातम्या