AFC Champions League: पर्सेपोलिसविरुद्धच्या पराभवानंतर एफसी गोवाचे प्रशिक्षक निराश

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

एफसी गोवाच्या अपयशाचे खापर मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी खेळाडूंच्या थकव्यावर फोडले.

पणजी: आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल (AFC Champions League) स्पर्धेत इराणच्या पर्सेपोलिस (Persepolis) एफसीकडून सलग दुसरा पराभव पत्करावा लागल्यानंतर एफसी गोवाच्या अपयशाचे खापर मुख्य प्रशिक्षक (Goa Coach) हुआन फेरांडो (Juan Ferrando) यांनी खेळाडूंच्या थकव्यावर फोडले. सामन्यात चुका केल्याची कबुलीही त्यांनी दिली.

निराशा व्यक्त करताना फेरांडो म्हणाले, ``सामना खूपच खडतर होता. संघातील बरेच खेळाडू दमलेत. त्यामुळे संघात खूप बदल करणे भाग पडले.`` फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी रात्री झालेल्या लढतीत एफसी गोवाने सुरवातीच्या अकरा सदस्यीय संघात पाच बदल केले. (AFC Champions League FC Goa coach disappointed after defeat against Persepolis)

``मागील सामन्यातून खेळाडू सावरले नव्हते. सामन्याच्या कालावधीत एक अतिरिक्त दिवस असता, तर चांगले झाले असते. त्यामुळे संघाच्या तयारीस पुरेसा वेळ मिळाला असता, पण पराभवास हे कारण देणार नाही. सामन्यात आम्ही बचाव, चेंडूवरील नियंत्रण आदींत कित्येक चुका केल्या, पर्सेपोलिस जिंकण्यास लायक होते,`` असे 40 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षक म्हणाले.

AFC Champions League: एफसी गोवास आणखी एक संधी; परतीच्या लढतीत पर्सेपोलिस एफसीचे...

एफसी गोवास स्पर्धेच्या ई गटातील पहिल्या टप्प्यात 20 एप्रिल रोजी पर्सेपोलिस संघाकडून 2-1 फरकाने हार पत्करावी लागली. त्यानंतर शुक्रवारी परतीच्या लढतीत पर्सेपोलिस संघाने 4-0 फरकाने विजय मिळवून गटातील सलग चौथा विजय नोंदविला. इराणच्या अव्वल संघाचे आता 12 गुण झाले असून सोमवारी (ता. 26) संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबला हरविल्यास त्यांचे `राऊंड ऑफ 16` फेरीतील स्थान पक्के होईल. एफसी गोवाचे चार लढतीतून दोन गुण असून त्यांचा पुढील सामना कतारच्या अल रय्यान क्लबविरुद्ध होईल. गटात अल वाहदाचे सात गुण असून अल रय्यानच्या खाती फक्त एक गुण आहे.

मनोबल खच्ची होण्याचा धोका

``पराभवातील 4-0 हा फरक चांगला नाही, त्यामुळे आमच्यासाठी अल रय्यानविरुद्धचा सामना कठीण ठरू शकतो. स्पर्धेचा एकच आठवडा बाकी असून अल रय्यान व अल वाहदा संघास सामोरे जायचे आहे ही बाब खेळाडूंसाठी मानसिकदृष्ट्या खडतर असेल,`` अशी भीती फेरांडो यांनी व्यक्त केली. ``खेळाडूंची मानसिकता बदलणे हाच माझा दृष्टिकोन असून त्यात जादूई उपाययोजना नाही,`` असे ते शेवटी म्हणाले.

 

संबंधित बातम्या