AFC Champions League: बरोबरीनंतर एफसी गोवाचे प्रशिक्षक समाधानी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 एप्रिल 2021

एफसी गोवास आक्रमणात अजून सुधारणेस वाव असल्याचे मत मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी व्यक्त केले.

पणजी: आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत कतारच्या मातब्बर अल रय्यान क्लबला गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर, कामगिरी समाधान देणारी असली, तरी एफसी गोवास आक्रमणात अजून सुधारणेस वाव असल्याचे मत मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी व्यक्त केले. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी रात्री झालेल्या ई गट लढतीत एफसी गोवाने स्पर्धेतील पदार्पणात गुण कमविण्याचा पराक्रम साधला. त्यानंतर फेरांडो यांनी सांगितले, की ``प्रशिक्षकाच्या नजरेतून पाहता, आम्हाला काही तांत्रिक बाबीत प्रगती साधायला हवी. ही एएफसी चँपियन्स लीग आहे, त्यामुळे आक्रमणाच्या बाबतीत आणखी प्रगती आवश्यक आहे. प्रत्येक पैलूंवर तयारी गरजेची आहे.``

स्पर्धेतील पहिल्याच लढतीत अतिशय चांगल्या संघाविरुद्धच्या कामगिरीने आम्ही आनंदित आहोत, असे 40 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षक फेरांडो यांनी नमूद केले. प्रतिस्पर्ध्यांच्या दर्जाविषयी सर्वांनाच माहिती होती. 1998 मध्ये विश्वकरंडक जिंकलेल्या फ्रान्स संघातील लॉरें ब्लांक (अल रय्यानचे प्रशिक्षक) यांच्याविरुद्ध खेळणे खूप कठीण होते, मात्र आम्ही या गुणावर समाधानी आहोत, असे फेरांडो म्हणाले. अल रय्यानचा सामना करण्यापूर्वी एफसी गोवाचे खेळाडू तणावाखाली होते ही बाब फेरांडो यांनी मान्य केली, पण सराव सत्रातील तयारीचा फायदा झाल्याचा त्यांनी स्पष्ट केले. एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना शनिवारी  संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबविरुद्ध होईल. स्पर्धेतील पहिल्या लढतीत अल वाहदा क्लबला इराणच्या पर्सेपोलिस क्लबकडून एका गोलने हार पत्करावी लागली होती. (AFC Champions League FC Goa coach satisfied after draw)

AFC Champions League: एफसी गोवाची ऐतिहासिक कामगिरी; अल रय्यान क्लबला गोलशून्य...

हवामान आणि आर्द्रतेचा फटका : ब्लांक

एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत गोव्यातील पहिला सामना खेळताना येथील हवामान आणि आर्द्रतेचा फटका बसल्याचे कारण अल रय्यान क्लबचे फ्रेंच प्रशिक्षक लॉरें ब्लांक यांनी दिले. अल रय्यान क्लबला गोलशून्य बरोबरीत रोखताना एफसी गोवाने प्रदर्शित केलेल्या भक्कम बचाव तंत्राचेही 55 वर्षीय ब्लांक यांनी कौतुक केले. सामन्यात आपल्या संघाने गोल करण्याच्या संधी गमावल्याची खंत ब्लांक यांनी व्यक्त केली. एफसी गोवाविरुद्ध अल रय्यान क्लब संभाव्य विजेता होता, पण पदार्पण करणाऱ्या संघाने त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखून चकीत केले. अल रय्यान क्लबचा पुढील सामना इराणच्या पर्सेपोलिस संघाविरुद्ध शनिवारी खेळला जाईल.
 

संबंधित बातम्या