AFC Champions League: मेहनती मार्टिन्सकडून चांगल्या कामगिरीचा फेरांडोंना विश्वास

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 मे 2021

26 वर्षीय मध्यरक्षक इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघात स्थान मिळवून शकला.

पणजी : भारतीय फुटबॉल संघातील नवा चेहरा ग्लॅन मार्टिन्स (Glan Mrtins) संधी मिळाल्यानंतर चांगली कामगिरी बजावेल असा विश्वास एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांना वाटत आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) व एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल (AFC Champions League)  स्पर्धेत ग्लॅन मार्टिन्सची कामगिरी प्रशिक्षक फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली बहरली. त्या बळावर 26 वर्षीय मध्यरक्षक इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघात स्थान मिळवून शकला. दोहा येथे होणाऱ्या विश्वकरंडक व आशिया करंडक पात्रता स्पर्धेसाठी मार्टिन्सला 28 सदस्यीय भारतीय संघात प्रथमच जागा मिळाली आहे. (AFC Champions League Ferrando believes in good performance from hardworking Martins)

गोव्यातील स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि चर्चिल ब्रदर्स क्लबतर्फे आय-लीग फुटबॉल स्पर्धेत खेळल्यानंतर मार्टिन्सने 2020-21 मोसमातील आयएसएल स्पर्धेत कोलकात्यातील एटीके मोहन बागानतर्फे पदार्पण केले, त्यानंतर तेथे जास्त संधी न मिळाल्यामुळे तो जानेवारी अखेरीस एफसी गोवा संघात दाखल झाला आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने कारकिर्दीत उंची गाठली. मोसमात एफसी गोवाने आयएसएल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, तर चँपियन्स लीग स्पर्धेच्या ई गटात तिसरा क्रमांक पटकावून छाप पाडली, त्यात मार्टिन्सचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

AFC Champions League: एफसी गोवास आगामी मोसमात लाभ होण्याची आशा

अतिशय मेहनती खेळाडू

मार्टिन्सबद्दल फेरांडो यांनी `इंडियनसुपरलीग डॉट कॉम`ला सांगितले, की ग्लॅन एफसी गोवा संघात जानेवारी महिन्यात दाखल झाला. तो अतिशय मेहनती आहे. सराव सत्र असो वा सामने, तो नेहमीच संघाच्या प्रत्येक बाबीत पूर्णतः सहभागी असतो. खेळाडू या नात्याने त्याने नेहमीच शिकणे आणि प्रगतीचे ध्येय बाळगले, तसेच संघाच्या लक्ष्यप्राप्तीचे उद्दिष्ट्य बाळगले. ``माझ्यानुसार, ग्लॅनबाबत सर्वांत उल्लेखनीय बाब म्हणजे, दैनंदिनी कार्य आणि खेळ समजून घेण्यात त्याचा सहभाग असतो. त्याची निर्णय क्षमता चांगली आहे आणि सोबत खेळणाऱ्या सहकाऱ्यांनाही तो त्यात सामील करून घेतो. ग्लॅनचा खेळातील अभ्यास चांगला आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे, मैदानावर तो पूर्ण आनंद लुटतो,`` असे फेरांडो यांनी ग्लॅनच्या कामगिरीचे विश्लेषण करताना सांगितले.

भारतातील परिस्थितीची चिंता

फेरांडो यांना कोरोना विषाणू महामारीमुळे भारतातील सध्याच्या परिस्थितीची चिंता वाटत आहे आणि स्थिती लवकरच सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

``त्याच्यापाशी (ग्लॅन) कौशल्य असून तो परिश्रमी खेळाडू आहे. त्याला आणि पूर्ण संघाला माझ्या शुभेच्छा असून राष्ट्रीय संघ चांगले निकाल नोंदवून सध्याच्या आणि भविष्यातील भारतीय फुटबॉलला चालना देईल अशी आशा बाळगतो.``

- हुआन फेरांडो,

एफसी गोवाचे प्रशिक्षक    

संबंधित बातम्या