विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी अमितकडे गोव्याचे नेतृत्व कायम

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी अमितकडे गोव्याचे नेतृत्व कायम
Copy of Gomantak Banner - 2021-02-11T190650.643.jpg

पणजी : विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याच्या वीस सदस्यीय संघात मध्यमगती गोलंदाज हर्षद गडेकर व यष्टिरक्षक कीनन वाझ यांनी दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केले आहे. अष्टपैलू अमित वर्मा याच्याकडे संघाचे नेतृत्व कायम आहे. गोव्याचा संघ स्पर्धा जैवसुरक्षा वातावरण अंमलबजावणीसाठी शुक्रवारी रवाना होईल. गोव्याचा एलिट अ गटात समावेश असून बडोदा (ता. 20), गुजरात (ता. 22), छत्तीसगड (ता. 24), त्रिपुरा (ता. 26), हैदराबाद (ता. 28) या संघांविरुद्ध सामने होतील. एलिट अ गटसाखळीतील सर्व सामने गुजरातमधील सूरत येथे खेळले जातील.

हर्षद व कीनन यांचा अपवाद वगळता बाकी 18 खेळाडूंची सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेसाठी गोव्याच्या संघात निवड झाली होती. दोड्डा गणेश यांनी प्रशिक्षकपदाचा आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर गोवा क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांच्या देखरेखीखालील सपोर्ट स्टाफमध्ये निनाद पावसकर व राहुल केणी हे संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत.

संघात पुन्हा संधी

गोव्याचा पाहुणा करारबद्ध खेळाडू बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडा याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या जागी 34 वर्षीय हर्षदची निवड झाली आहे. हा मध्यमगती गोलंदाज नोव्हेंबर 2014 मध्ये गोव्याकडून शेवटच्या वेळेस एकदिवसीय क्रिकेट खेळला होता. त्याने 20 एकदिवसीय सामन्यांत 28 गडी बाद केले आहेत. गोव्याचा प्रमुख फलंदाज अमोघ देसाई दुखापतग्रस्त आहे, त्याच्या जागी 29 वर्षीय कीनन वाझ याची निवड झाली आहे. एकनाथ केरकर याच्यानंतर कीनन संघातील दुसरा यष्टिरक्षक असेल. तो ऑक्टोबर 2018 मध्ये गोव्याकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. कीनन ३३ एकदिवसीय सामन्यांत एका शतकासह 573 धावा करताना 28 झेल व आठ यष्टिचित अशी कामगिरी बजावली आहे.


गोव्याचा संघ

निहाल सुर्लकर, कीनन वाझ, विश्वंबर काहलोन, मलिकसाब शिरूर, वैभव गोवेकर, ईशान गडेकर, हेरंब परब, दर्शन मिसाळ, दीपराज गावकर, स्नेहल कवठणकर, शुभम देसाई, विजेश प्रभुदेसाई, हर्षद गडेकर, फेलिक्स आलेमाव, अमित वर्मा, एकनाथ केरकर, सुयश प्रभुदेसाई, लक्षय गर्ग, अमूल्य पांड्रेकर, आदित्य कौशिक.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com