ISL 2020-21 : बंगळूरला दोन गोलने नमवून प्ले-ऑफ फेरीच्या उंबरठ्यावर एटीके मोहन बागान

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

सामन्याच्या पूर्वार्धात रॉय कृष्णा आणि मार्सेलिन्हो यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर एटीके मोहन बागानने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील दबदबा कायम राखला.

पणजी : सामन्याच्या पूर्वार्धात रॉय कृष्णा आणि मार्सेलिन्हो यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर एटीके मोहन बागानने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील दबदबा कायम राखला. त्यांनी बंगळूर एफसीस 2 - 0 फरकाने हरवून प्ले-ऑफ फेरीचा उंबरठा गाठला. कोलकात्यातील संघ आता अव्वल स्थानावरील मुंबई सिटीपेक्षा एका गुणाने मागे आहे. मुंबई सिटी संघ 34 गुणांसह यापूर्वीच प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरला आहे. सामना मंगळवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

फिजी देशाच्या रॉय कृष्णा याने 37 व्या मिनिटास पेनल्टीवर अचूक लक्ष्य साधल्यानंतर, 44 व्या मिनिटास ब्राझीलियन मार्सेलिन्हो याच्या डाव्या पायाचा फ्रीकिक फटका खूपच भेदक ठरला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही एटीके मोहन बागानने बंगळूरला एका गोलने हरविले होते. एटीके मोहन बागानचा हा सलग तिसरा, तर एकंदरीत दहावा विजय ठरला. त्यांचे आता 16 लढतीतून 33 गुण झाले आहेत. बंगळूरला सहावा पराभव पत्करावा लागला. 17 लढतीनंतर 19 गुण आणि सहावा क्रमांक कायम राहिल्यामुळे बंगळूरच्या प्ले-ऑफ फेरीच्या आशांनाही धक्का बसला.

INDvsENG : दारुण पराभवानंतर पीटरसनने टीम इंडियाला डिवचलं; केलं हिंदीत ट्विट!

पूर्वार्धात एटीके मोहन बागानने दोन गोलची दमदार आघाडी घेतली होती. विश्रांतीला आठ मिनिटे बाकी असताना रॉय कृष्णा याने पेनल्टी फटका अचूक मारत कोलकात्याच्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्याचा यंदाच्या स्पर्धेतील बारावा गोल ठरला. पेनल्टी क्षेत्रात कृष्णा याला प्रतीक चौधरी याने पाडले, त्याची मोठी किंमत बंगळूरला चुकवावी लागली. फिजीच्या आंतरराष्ट्रीय स्ट्रायकरने गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याचा अंदाज चकवत चेंडूला नेटची दिशा दाखविली. विश्रांतीला एक मिनिट बाकी असताना ब्राझीलियन मार्सेलिन्हो याने एटीके मोहन बागानतर्फे मोसमातील दुसरा गोल नोंदविला. बंगळूरच्या हरमज्योत खब्रा याने बंगळूरच्या डेव्हिड विल्यम्सचा रोखण्याच्या प्रयत्नात चूक केली. मिळालेल्या फ्रीकिकवर मार्सेलिन्हो याने डाव्या पायाने अप्रतिम नेम साधत संघाला दोन गोलची आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर चौथ्याच मिनिटास सेटपिसेसवर एटीके मोहन बागानच्या संदेश झिंगन याचा फटका गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने वेळीच रोखत बंगळूरची पिछाडी दोन गोलपुरती मर्यादित राखली. साठाव्या मिनिटास गोलरक्षक संधूने मनवीर सिंग याचाही फटका विफल केला.

दृष्टिक्षेपात...

- रॉय कृष्णा याचे यंदा 16 सामन्यात 12 गोल, एकंदरीत 37 आयएसएल लढतीत 27 गोल

- मार्सेलिन्हो याचे एटीके मोहन बागानतर्फे 3 सामन्यात 2 गोल, आयएसएल स्पर्धेतील 74 सामन्यांत एकूण 33 गोल

- एटीके मोहन बागानचे यंदा स्पर्धेत 22 गोल, मुंबई सिटी (25), एफसी गोवा (24) यांच्यानंतर तिसरे

- एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याच्या स्पर्धेत सर्वाधिक 9 क्लीन शीट्स

- यंदा स्पर्धेत एटीके मोहन बागान व मुंबई सिटीचे सर्वाधिक प्रत्येकी 10 विजय

- बंगळूर एफसीच्या हरमज्योत खब्रा याचे 100 आयएसएल सामने
 

संबंधित बातम्या