दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय ; भारतीय संघासमोर मालिकेतील आव्हान कायम राखण्याचे आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सिडनीच्याच मैदानावर सुरू झाला आहे. आव्हान कायम राखण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे, परंतु पहिल्या सामन्यातील सर्वच बाबतीतील कामगिरी कमालीची पाठीमागे टाकणारी आहे. 

सिडनी : नऊ महिन्यांनंतर खेळत असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाने वारेमाप चुका केल्या, पण चुका सुधारण्याचेही संकेत मिळाले. २४ तासांनंतर लगेचच दुसरा सामना खेळत असल्यामुळे सुधारणा करण्याची संधी मिळणार का? तसे घडले नाही तर सावरण्याच्या अगोदरच एकदिवसीय मालिका गमावण्याची नामुष्की ओढावणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज सिडनीच्याच मैदानावर होत आहे. आव्हान कायम राखण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे, परंतु पहिल्या सामन्यातील सर्वच बाबतीतील कामगिरी कमालीची पाठीमागे टाकणारी आहे. 

कोठे करावी लागणार सुधारणा?
१) गोलंदाजांना टप्पा आणि दिशा तसेच विविधता आणावी लागणार.
२) झेल आणि मैदानी क्षेत्ररक्षणात प्रगती.
३) ५०-५० षटकांचा हा खेळ आहे, त्यामुळे तेवढा संयम दाखवावा लागणार.
४) सहाव्या गोलंदाजांचा विचार करावा लागणार.

संयम दाखवायला हवा
दोन महिने आयपीएल खेळल्यामुळे भारतीय फलंदाजांवर ट्‌वेन्टी-२० चा प्रभाव शुक्रवारच्या सामन्यात जाणवत होता. ३७५ धावांचे भलेमोठे लक्ष्य असताना शिखर धवन-मयांक अगरवाल यांनी वेगवान अर्धशतकी सलामी विराटसह पुढच्या फलंदाजांना संयम दाखवता आला नाही. एका धावेवर जीवदान मिळूनही विराटने आततायी फटका मारून विकेट गमावली होती. श्रेयस अय्यर, केएल राहुल यांनीही त्याच चुका केल्या. ४ बाद १०१ अशी अवस्था झाल्यानंतर हार्दिक पंड्या-शिखर धवन यांनी लढा कायम ठेवला होता. विशेष म्हणजे ३८ व्या षटकापर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा पुढे होता. याचाच अर्थ आव्हान कितीही असले किवा प्रथम फलंदाजी करत असलात तरी विकेट हातात ठेवल्या तर अंतिम षटकांत टॉप गिअर टाकता येतो याचा विचार केला तरच भारतीयांना आव्हान कायम ठेवण्याची संधी मिळणार आहे.

दिशाहिन गोलंदाजी
बुमरा, शमी, सैनी असे आयपीएल गाजवणारे गोलंदाज पहिल्या सामन्यात दिशाहीन झाले होते. त्यातच युझवेंद्र चहल भारताकडून सर्वाधिक महागडा (१० षटकांत ८९ धावा) गोलंदाज ठरला होता. सर्वांनी मिळून अखेरच्या दहा षटकांत शंभरहून अधिक धावा दिल्या होत्या. या अपयशात कमालीची सुधारणा उद्या केली नाही तर मागचे पाढे पंचावन्न असेच म्हणायची वेळ येईल.

सिडनीचा इतिहास
शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला असला तरी सिडनीचे मैदान गेल्याच वर्षी भारतीयांसाठी फलदायी ठरले होते. जानेवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने पिछाडीवरून याच मैदानावर मालिका २-१ अशी जिंकली होती. त्या वेळी डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ यांच्यावर बंदीच होती. पॅट कमिंस, मिशेल स्टार्क आणि जोश हॅझलवूड या वेगवान त्रयीपैकी कोणीच संघात नव्हते. आता मात्र ऑस्ट्रेलिया या पाचही जणांसह खेळत आहे.

दृष्टिक्षेपात

  •     सिडनीचे मैदान विराटसाठी अपयशी. या मैदानावरच                      आत्तापर्यंतची त्याची सरासरी ११.४०
  •     शुक्रवारच्या सामन्यात केलेली २१ ही धावसंख्या त्याची सर्वोत्तम
  •     ऑस्ट्रेलियाच्या इतर मैदानावर मात्र विराटकडून धावांचा पाऊस
  •     स्ट्राईक रेटच्या तुलनेत हार्दिक पंड्या भारतीयांपेक्षा सरस.                सर्वांपेक्षा अधिक लवकर एक हजार धावा पूर्ण.

 

अधिक वाचा :

आयएसएलमध्ये बंगळूर सलग दुसऱ्या लढतीत विजयापासून दूर ; कालच्या सामन्यात हैदराबादशी बचावात्मक बरोबरी -

 

 

संबंधित बातम्या