धीरज एफसी गोवासाठी `सुपरमॅन`सारखा प्रशिक्षक हुआन फेरांडोने केलं कौतुक

Coach Juan Ferrando like Superman for Dheeraj FC Goa
Coach Juan Ferrando like Superman for Dheeraj FC Goa

पणजी : आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग स्पर्धेतील ई गटात सलग दोन सामने एकही गोल न स्वीकारलेला आणि अफलातून गोलरक्षणामुळे लक्षवेधी ठरलेला धीरज सिंग मोईरांगथेम एफसी गोवासाठी `सुपरमॅन`सारखा असल्याचे सांगत मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी वीस वर्षीय युवा गोलरक्षकाची पाठ थोपटली. त्याने स्पर्धेत सलग 180 मिनिटे क्लीन शीट राखली आहे.

एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत प्रभावी पदार्पण करताना एफसी गोवा संघाने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पहिल्या दोन्ही लढतीत गोलशून्य बरोबरी नोंदवून दोन गुणांची कमाई केली आहे. एफसी गोवाने अगोदर कतारच्या अल रय्यान क्लबला, तर शनिवारी रात्री संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबविरुद्ध एका गुणाची कमाई केली. दोन्ही लढतीत धीरजचे भक्कम गोलरक्षण लक्षणीय ठरले. (Coach Juan Ferrando like Superman for Dheeraj FC Goa)

एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत धीरज दोन लढतीत मिळून एकूण नऊ फटके रोखले आहेत, त्यापैकी सहा अल वाहदाविरुद्धच्या सामन्यात होते. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये धीरज अफलातून चपळाई प्रदर्शित करताना अगदी जवळून फटका अडविला, त्यामुळे अल वाहदा क्लबला विजय हुकला. या संघाचे डच प्रशिक्षक हेन्क टेन काटे यांनीही धीरजला शाबासकी दिली.

``मला वाटतं आजच्या लढतीतील तो उत्कृष्ट गोलरक्षक होता,`` असे फेरांडो यांनी अल वाहदाविरुद्धच्या सामन्यानंतर धीरजचे कौतुक करताना सांगितले. ``धीरज आज सुपरमॅन होता,`` असे नमूद करून, ``त्याने अडविलेले फटके अतिशय चांगले होते. आता एक गोष्ट नक्की आहे, त्याने आता सामन्याच्या कालावधीत पासिंगमध्ये प्रगती साधणे आवश्यक आहे, ही बाब आमच्या शैलीत महत्त्वाची आहे,`` असे फेरांडो यांनी युवा गोलरक्षकास सल्ला देताना नमूद केले. ``धीरज अतिशय मेहनती आहे आणि तो फक्त वीस वर्षांचा असल्यामुळे त्याच्यासोबत काम करणे विलक्षण ठरते,`` असे फेरांडो म्हणाले.

धीरजचे सांघिक कामगिरीस श्रेय

अल वाहदाविरुद्धच्या बरोबरीनंतर धीरज सांघिक कामगिरीस श्रेय दिले. तो म्हणाला, ``आम्ही सांघिक पातळीवर खेळलो आणि उत्कृष्ट योगदान दिले, या कारणास्तव आम्ही दुसऱ्यांदा क्लीन शीट राखू शकलो. वैयक्तिक आणि संघासाठी हा सकारात्मक निकाल आहे, जो आगामी लढतीपूर्वी आत्मविश्वास उचांवणारा आहे.`` एफसी गोवाचा ई गटातील तिसरा सामना मंगळवारी (ता. 20) इराणच्या पर्सोपोलिस संघाविरुद्ध होणार आहे.

विश्वकरंडकात गोलरक्षण

भारतात 2017 साली झालेल्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत यजमान संघासाठी धीरज मुख्य गोलरक्षक होता. 2018-19 मोसमात मणिपूरमधील या या गोलरक्षकाने केरळा ब्लास्टर्सतर्फे इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत पदार्पण केले. त्याला भारताच्या 23 वर्षांखालील संघातही स्थान मिळविले, पण एटीके मोहन बागानतर्फे 2020-21 मोसमात संधी न मिळाल्यानंतर यावर्षी जानेवारी ट्रान्स्फर विंडोत त्याने एफसी गोवाशी करार केला. यंदा आयएसएलमध्ये तो एफसी गोवातर्फे नऊ सामने खेळला. त्यात त्याने 840 मिनिटांच्या खेळात 12 गोल स्वीकारले, तर 16 फटके अडविले. एकंदरीत तो 23 आयएसएल सामन्यांत 2100 मिनिटे खेळला असून 33 गोल स्वीकारले आहेत, 50 वेळा फटके अडविले.

``सामन्याच्या पूर्वार्धानंतर प्रशिक्षकांनी आम्हाला नैसर्गिक खेळ करण्याची सूचना केली. आम्ही केवळ एफसी गोवाचे नव्हे, तर साऱ्या भारताचे प्रतिनिधित्व करत आहोत. आमच्यासाठी हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे.``

- धीरज सिंग, गोलरक्षक एफसी गोवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com