ISL2020-21 : एफसी गोवाचा ओडिशावर दमदार विजय; गुणतक्त्यात चौथ्या स्थानी झेप 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

सलग अकराव्या सामन्यात अपराजित राहताना एफसी गोवाने ओडिशा एफसीवर 3 - 1 फरकाने सफाईदार विजय मिळविला. 

पणजी : सलग अकराव्या सामन्यात अपराजित राहताना एफसी गोवाने ओडिशा एफसीवर 3 - 1 फरकाने सफाईदार विजय मिळविला आणि सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत प्ले-ऑफ फेरीच्या शर्यतीत आव्हान कायम राखले. ते आता चौथ्या स्थानी आले आहेत.

सामना बुधवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. एफसी गोवाचे पहिले दोन्ही गोल स्पॅनिश मध्यरक्षकांनी नोंदविले. आल्बर्टो नोग्युएरा याने 18 व्या, तर होर्गे ओर्तिझ याने 26व्या मिनिटास लक्ष्य साधले. सामन्याच्या 75 व्या मिनिटास स्पॅनिश बचावपटू इव्हान गोन्झालेझ याने सेटपिसेसवर एफसी गोवाच्या खाती तिसऱ्या गोलची भर टाकली. ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियो याच्या गोलमुळे 30व्या मिनिटास ओडिशाला पिछाडी एका गोलने कमी करता आली.

Australian Open : स्टेफनोस सीतीसिपासकडून राफेल नदालला पराभवाचा धक्का  

एफसी गोवाचा हा 18 सामन्यातील एकंदरीत सहावा, तर सलग सहा बरोबरीनंतर पहिला विजय ठरला. हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आता 27 गुण झाले असून त्यांनी गुणतक्त्यात हैदराबाद एफसीला गाठले आहे. गोलसरासरीत हैदराबाद (+8) तिसऱ्या, तर एफसी गोवा (+7) चौथ्या स्थानी आहे. पाचव्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेडचे 26 गुण आहेत. ओडिशाला 18 लढतीत अकरावा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांचे नऊ गुण आणि शेवटचा अकरावा क्रमांक कायम राहिला.

पूर्वार्धात एफसी गोवाची आघाडी

सामन्याचा पूर्वार्ध रंगतदार ठरला. स्पर्धेत सर्वाधिक आठ असिस्टची नोंद केलेल्या आल्बर्टो नोग्युएरा याने आयएसएल स्पर्धेतील पहिला गोल नोंदवत एफसी गोवास आघाडी मिळवून दिली. इव्हान गोन्झालेझच्या असिस्टवर नेटसमोरून त्याने साधलेले ताकदवान हेडिंग अचाट ठरले. बंदुकीतील गोळीप्रमाणे चेंडू नेटमध्ये घुसला, त्यासमोर गोलरक्षक अर्शदीप पूर्णपणे हतबल ठरला. त्यापूर्वी सामन्याच्या चौथ्याच मिनिटास नोग्युएराची संधी गोलरक्षक अर्शदीप सिंगच्या दक्षतेमुळे फोल ठरली होती. त्यानंतर आठ मिनिटांनी होर्गे ओर्तिझ याने वेगवान धाव घेताना ओडिशाच्या अतिशय खराब बचावाचा लाभ उठवत एफसी गोवाची आघाडी वाढविली. दोन गोलच्या पिछाडीनंतर ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियोने मोसमातील दहावा गोल करत ओडिशाची पिछाडी कमी केली. पुन्हा एकदा गोलरक्षक धीरज सिंगची चूक एफसी गोवासाठी महागात पडली. ओडिशाच्या राकेश प्रधानचा फटका धीरज रोखू शकला नाही, त्याचा लाभ मॉरिसियोने उठविला.

एफसी गोवाची आघाडी भक्कम

सामना संपण्यास पंधरा मिनिटे बाकी असताना इव्हान गोन्झालेझ याच्या गोलमुळे एफसी गोवाची आघाडी आणखीनच भक्कम झाली. हा गोल सेटपिसेसवर झाला. कॉर्नर किकवर गोन्झालेझचे हेडिंग ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप याने रोखले, पण रिबाऊंडवर चेंडू ताबा राखत स्पॅनिश बचावपटूने अगदी जवळून नेम साधला. त्यानंतर सात मिनिटानंतर गोन्झालेझची संधी हुकली, त्याच्या हेडिंगवर चेंडू गोलपट्टीला आपटला.

दृष्टिक्षेपात...

- आल्बर्टो नोग्युएरा याचा मोसमातील 17 सामन्यांत 1 गोल

- होर्गे ओर्तिझचे यंदाच्या स्पर्धेत 18 लढतीत 6 गोल

- इव्हान गोन्झालेझचे मोसमात 16 सामन्यांत 2 गोल

- दिएगो मॉरिसियोचे 18 आयएसएल लढतीत 10 गोल

- सलग 11 सामने अपराजित असलेल्या एफसी गोवाचे 4 विजय, 7 बरोबरी

- एफसी गोवाचे स्पर्धेत सर्वाधिक 29 गोल

- ओडिशा 9 सामने विजयाविना, 4 बरोबरी, 5 पराभव

- ओडिशावर स्पर्धेत सर्वाधिक 11 पराभवांची नामुष्की

- प्रतिस्पर्ध्यांचे ओडिशावर 33 गोल, केरळा ब्लास्टर्सशी बरोबरी
 

संबंधित बातम्या