ISL 2020-21 : हैदराबादला गोलशून्य बरोबरीत रोखून एफसी गोवा प्ले-ऑफ फेरीत दाखल

ISL
ISL

पणजी : बचावपटू इव्हान गोन्झालेझ एफसी गोवासाठी रविवारी तारणहार ठरला. त्याने इंज्युरी टाईममध्ये हैदराबादच्या लिस्टन कुलासो याचा फटका ऐनवेळी रोखल्यामुळे गोव्याचा संघ पराभवापासून बचावला आणि त्यांना सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीत जागा मिळवता आली. निर्धारित नव्वद मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.

सामना रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. एफसी गोवाने स्पर्धेच्या सात मोसमाच्या इतिहासात सहाव्यांदा प्ले-ऑफ फेरी गाठली. त्यांना दोन टप्प्यातील उपांत्य फेरीसाठी बरोबरीच्या एका गुणाची आवश्यकता होती, जे त्यांनी साध्य केले. स्पर्धेतील दहाव्या बरोबरीमुळे एफसी गोवाचे 20 लढतीतून 31 गुण झाले. त्यांना चौथा क्रमांक मिळाला. हैदराबादला विजयाच्या पूर्ण तीन गुणांची गरज होती. बरोबरीमुळे त्यांचे स्वप्न भंगले. त्यांची ही अकरावी बरोबरी ठरली. त्यांचे 20 लढतीनंतर 29 गुण झाले व त्यांना पाचवा क्रमांक मिळाला.

सामन्यातील शेवटची तीन मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू या नात्याने मैदानाबाहेर गेलेल्या दोन्ही संघांच्या प्रत्येकी एका खेळाडूस रेड कार्ड मिळाले. हैदराबादच्या लुईस सास्त्रे व एफसी गोवाच्या आल्बर्टो नोग्युएरा यांच्यावर रेफरीने अखिलाडूवृत्तीबद्दल कारवाई केली. एफसी गोवाच्या बचावफळीत भक्कम ठरलेला आदिल खान सामन्याचा मानकरी ठरला.

एफसी गोवा संघ सेटपिसेसवर कमजोर आहे याची जाणीव असल्याने मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादने उत्तरार्धात प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्यास सुरवात केली, पण त्यांना यश मिळाले नाही. हैदराबादला आज कर्णधार आरिदाने सांताना याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. स्पर्धेत 10 गोल व दोन असिस्ट नोंदविलेला हा हुकमी स्पॅनिश खेळाडू स्पर्धेतील चौथ्या यलो कार्डमुळे लढतीसाठी निलंबित ठरला.

एफसी गोवा संघ बचावला

सामन्यातील पाच मिनिटे बाकी असताना हैदराबादला आघाडीची संधी होती, परंतु लिस्टन कुलासोच्या असिस्टवर हालिचरण नरझारी अचूक फटका मारू शकला नाही. सामन्याच्या इंज्युरी टाईममधील तिसऱ्या मिनिटास हैदराबादने जवळपास आघाडी घेतली होती, पण बचावपटू इव्हान गोन्झालेझ याच्या दक्षतेमुळे एफसी गोवा पिछाडीवर जाण्यापासून बचावला. यावेळी स्पॅनिश खेळाडूने लिस्टन कुलासोचा फटका गोललाईनवरून परतावला. लगेच एफसी गोवा संघ स्वयंगोलपासून बचावला. आदिल खान याच्या हेडरवर गोलरक्षक धीरज सिंग याने पूर्ण एकाग्रतेने उंचावत नेटमध्ये घुसू पाहणाऱ्या चेंडूची दिशा बदलली.

दृष्टिक्षेपात...

-एफसी गोवा संघ सलग 13 सामने अपराजित, या कालावधीत 5 विजय, 8 बरोबरी, आयएसएलमधील नवा विक्रम

- हैदराबाद 12 सामन्यांत अपराजित, 4 विजय, 8 बरोबरी

- हैदराबादच्या स्पर्धेत 8, तर एफसी गोवाच्या 3 क्लीन शीट्स

- आयएसएलमध्ये एफसी गोवा आणि हैदराबाद यांच्यात 4 लढतीत 1 बरोबरी

- हैदराबाद व चेन्नईयीन एफसी यांच्या स्पर्धेत सर्वाधिक 11 बरोबरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com