Goa Professional League: साळगावकर-कळंगुट सामन्यास गालबोट

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

कळंगुट असोसिएशनचा पेनल्टी गोल नाकारल्यानंतर मैदानावर राडा झाला आणि त्यामुळे साळगावकर एफसीविरुद्धचा सामना ७२व्या मिनिटानंतर खंडित करावा लागला. 

पणजी: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतीस मंगळवारी गालबोट लागले. कळंगुट असोसिएशनचा पेनल्टी गोल नाकारल्यानंतर मैदानावर राडा झाला आणि त्यामुळे साळगावकर एफसीविरुद्धचा सामना ७२व्या मिनिटानंतर खंडित करावा लागला. म्हापसा येथील धुळेर-म्हापसा येथील स्टेडियमवरील या लढतीत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. सामन्यातील अठरा मिनिटांचा खेळ बाकी असताना साळगावकर एफसीचा बचावपटू लिनबर्ट रिबेलो याने प्रतिस्पर्धी खेळाडू मेल्विन लोबो याला फटका पेनल्टी क्षेत्रात हाताळला.

त्यावेळी रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली. कळंगुट असोसिएशनच्या कौमे ज्युनियर याने शांतपणे अचूक फटका मारला, पण गोल नोंदविण्याच्या प्रक्रियेत खेळाडूने नियमाचे उल्लंघन केल्याचे कारण देत सामना रेफरीने हा गोल नाकारला आणि मैदानावरील वातावरण तंग बनले. खेळ होऊ न शकल्याने नंतर सामनाच खंडित करावा लागला. (Goa Professional League Galgaon in Salgaonkar Kalangut match)

Goa Professional League: पिछाडीवरून सेझा अकादमीची बाजी

सहाय्यक रेफरीशी चर्चा केल्यानंतर मुख्य रेफरीने पेनल्टी गोल नाकारल्यानंतर कळंगुटच्या खेळाडूंनी रेफरीस जाब विचारण्यास सुरवात केली. यावेळी मैदानावरील वातावरण चांगलेच तापले व रेफरीस ढकलण्यातही आले. या गोंधळात रेफरीने कळंगुटच्या मेल्विन लोबो याला यलो कार्डही दाखविण्यात आले. कळंगुटचे प्रशिक्षक व्हॅलेंटिन एझुगो यांचा पाराही चढला. मैदानावरील गोंधळ कायम राहिल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही. पेनल्टी गोल का नाकारण्यात आला याचा जाब कळंगुट असोसिएशनचे खेळाडू विचारत होते व ते खेळण्याच्या मनःस्थितीत नव्हते. या खंडित झालेल्या सामन्याच्या निकालाविषयी नंतर निर्णय घेतला जाईल असे गोवा फुटबॉल असोसिएशनतर्फे (जीएफए) स्पष्ट करण्यात आले आहे. 

 

संबंधित बातम्या