Goa Professional League: सेझा अकादमी विलगीकरणात

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 एप्रिल 2021

साळगावकर एफसी व सेझा फुटबॉल अकादमी यांच्यातील सामना एक संघ अनुपस्थितीत राहिल्यामुळे होऊ शकला नाही.

पणजी: गोवा प्रोफेशनल लीग (Goa Professional League) फुटबॉल स्पर्धेत सोमवारी नियोजित असलेला साळगावकर एफसी व सेझा फुटबॉल अकादमी यांच्यातील सामना एक संघ अनुपस्थितीत राहिल्यामुळे होऊ शकला नाही. साळगावकर एफसी संघ सोमवारी संध्याकाळी सामन्याच्या वेळेस म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर उपस्थित राहिला, तर सेझा अकादमीने मैदानाकडे पाठ फिरविली, त्यामुळे सामना होऊ शकला नाही. सामना न होण्यासंदर्भात गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) अधिकृत माहिती दिलेली नाही.(Goa Professional League Seja Academy in Separation)

प्राप्त माहितीनुसार, सेझा फुटबॉल अकादमीचा एक अधिकारी कोविड बाधित असल्याने संपूर्ण संघ विलगीकरणात आहे, त्यामुळे सोमवारचा सामना खेळता येणार नसल्याची पत्र सेझा अकादमीने जीएफएला पाठविले आहे. यापूर्वी विलगीकरण नियम न पाळता दोन सामने खेळल्याबद्दल त्या सामन्यातील विजयाचे प्रत्येकी तीन असे एकूण सहा गुण जीएफएने सेझा अकादमीच्या खात्यातून वजा केले आहेत, त्यामुळे यावेळी या संघाने धोका न पत्करता मैदानावर येण्याचे टाळले, असे सूत्राने सांगितले. 

Goa Professional League: चर्चिल ब्रदर्सने पराभव टाळला; शेवटच्या मिनिटाला गोल...

साळगावकर एफसी व सेझा अकादमी यांच्यात न झालेल्या सामन्याविषयी पुढील निर्णय जीएफए घेणार आहे. सामन्यासाठी सेझा अकादमी संघ मैदानावर न उतरल्यामुळे साळगावकर एफसीला पूर्ण तीन गुण देणार, की हा नियोजित सामना नव्या तारखेस खेळविणार का याबाबत जीएफए निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

संबंधित बातम्या