जमशेदपूरच्या आव्हानास गोवा सज्ज

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

जमशेदपूर एफसी संघ सेटपिसेसवर गोल करण्यात पटाईत असला, तरी त्यास प्रत्युत्तर देण्याची आमची व्यूहरचना आहे, असे सांगत प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी एफसी गोवा आव्हानास सज्ज असल्याचे नमूद केले.

पणजी: जमशेदपूर एफसी संघ सेटपिसेसवर गोल करण्यात पटाईत असला, तरी त्यास प्रत्युत्तर देण्याची आमची व्यूहरचना आहे, असे सांगत प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी एफसी गोवा आव्हानास सज्ज असल्याचे नमूद केले. सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सामना गुरुवारी (ता. 14) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.

``आमची रणनिती तयार आहे, पण ती आताच उघड करणार नाही. त्यांच्या आव्हानासाठी आमच्याकडे उत्तर आहे,`` असे फेरांडो सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाले. सध्या एफसी गोवा आणि जमशेदपूर एफसी यांच्यात दोन गुणांचा फरक आहे. सामन्याच्या अंतिम टप्प्यात गोल नोंदविणाऱ्या एफसी गोवाचे 10 लढतीतून 15, तर तेवढेच सामने खेळलेल्या जमशेदपूरचे 13 गुण आहेत.

एफसी गोवास मागील लढतीत ईस्ट बंगालविरुद्ध 1-1 गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले, तर जमशेदपूर एफसीला केरळा ब्लास्टर्सकडून 2-3 फरकाने धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघ गुरुवारी स्पर्धेतील चौथ्या विजयासाठी इच्छुक असेल. स्पर्धेतील धोकादायक संघांत त्यांची गणना होत असल्याने एफसी गोवास सावध राहावे लागेल.

चुका सुधारण्यावर भर

एफसी गोवा संघ चुका सुधारण्यावर भर देत असून सामन्यागणिक प्रगती साधत आहे, सराव सत्रात यावरच लक्ष केंद्रित असते. संघातील काही खेळाडू नवोदित आहेत. भविष्याचा विचार करताना ते सध्या शिकण्याच्या प्रक्रियेत आहे, असे मत फेरांडो यांनी व्यक्त केले.

आंगुलो विरुद्ध व्हॅल्सकिस

फातोर्डा येथे गुरुवारी एफसी गोवाचा स्पॅनिश इगोर आंगुलो व जमशेदपूरचा लिथुआनियन नेरियूस व्हॅल्सकिस यांच्याकडून गोलची अपेक्षा असेल. दोघेही गोल्डन बूटच्या शर्यतीत आहेत. आंगुलोने 9, तर व्हॅल्सकिसने 8 गोल नोंदविले आहेत. पहिल्या टप्प्यात जमशेदपूरविरुद्धच्या विजयात दोन्ही गोल आंगुलोने केले होते.

आणखी वाचा:

आयएसएलमधील आणखी एका मार्गदर्शकास निरोप  नॉर्थईस्ट युनायटेडची जेरार्ड नूस यांच्याशी फारकत; जमील अंतरिम प्रशिक्षक -

 

दृष्टिक्षेपात...

  • - एफसी गोवाची कामगिरी : 10 सामने, 4 विजय, 3 बरोबरी, 3 पराभव, 13 गोल, 11 गोल स्वीकारले, 15 गुण
  • - जमशेदपूर एफसीची कामगिरी : 10 सामने, 3 विजय, 4 बरोबरी, 3 पराभव, 12 गोल, 12 गोल स्वीकारले, 13 गुण
  • - पहिल्या टप्प्यात : 23 डिसेंबर 2020 रोजी वास्को येथे एफसी गोवाची जमशेदपूरवर 2-1 फरकाने मात
  • - आमने-सामने : एकूण लढती 7, एफसी गोवा विजयी 4, जमशेदपूर विजयी 2, बरोबरी 1, एफसी गोवाचे गोल 13, जमशेदपूरचे गोल 7

संबंधित बातम्या