ICC Test Rankings : हिटमॅन रोहित शर्मा आणि अश्विनची दमदार झेप  

ICC Test Rankings : हिटमॅन रोहित शर्मा आणि अश्विनची दमदार झेप  
ICC Test rankings

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये भारतीय संघाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दमदार कामगिरी केली. आणि त्यामुळे आंतराराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी मधील फलंदाजांच्या ताज्या आकडेवारीत रोहित शर्माने मोठी उडी घेतली आहे. आयसीसीने आज कसोटी फलंदाजांची यादी जाहीर केली. या यादीत रोहित शर्माने पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने पुन्हा करिअरची सर्वोत्कृष्ट रँकिंग मिळविली आहे. 

रोहित शर्माने भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या डे नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात चांगली आणि महत्वपूर्ण खेळी केली होती. रोहित शर्माने पहिल्या डावात 96 चेंडूंचा सामना करताना 66 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात रोहित शर्मा 25 धावांवर नाबाद राहिला होता. आणि याच खेळीच्या जोरावर रोहित शर्मा आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत 14 व्या स्थानावरुन 8 व्या स्थानावर पोहचला आहे. रोहित शर्माने सहा स्थानांची झेप घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शतकीय खेळी केली होती. आणि त्यानंतर तो 19 व्या क्रमांकावरून 14 व्या स्थानी आला होता. त्यानंतर रोहित शर्माने पुन्हा टॉप 10 मध्ये जागा मिळवल्यामुळे त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत दुसऱ्या वेळेस हा कारनामा केला आहे. 

त्यानंतर, आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीतील पहिल्या दहामध्ये आता तीन भारतीय खेळाडूंचा समावेश झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पाचव्या क्रमांकावर, रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आणि चेतेश्वर पुजारा दहाव्या क्रमांकावर आहे. या सामन्यापूर्वी पुजारा आठव्या क्रमांकावर होता,  मात्र इंग्लंडसोबतच्या सामन्यात चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाल्यामुळे त्याचे दोन स्थान घसरले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन 919 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. स्टीव्ह स्मिथ 891 गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. आणि लबूशेन तिसऱ्या नंबरवर आहे. 

याव्यतिरिक्त, भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील धमाकेदार कामगिरी केल्यामुळे त्याने आयसीसीच्या कसोटी  गोलंदाजांच्या यादीत चार स्थानांची उडी घेतली आहे. गोलंदाजांच्या यादीत पॅट कमिन्स पहिल्या आणि नील वॅगनर दुसऱ्या स्थानावर कायम आहे. आणि त्यानंतर अश्विन थेट तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका स्थानाने घसरण झेलावी लागली आहे. इंग्लंड सोबतच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह आठव्या स्थानावर होता. त्यानंतर आता तो नवव्या स्थानी घसरला आहे. आणि गोलंदाजांच्या यादीत सर्वात मोठी घसरण इंग्लंड संघाचा जेम्स अँडरसनने नोंदवली आहे. जेम्स अँडरसन तीन स्थानांनी घसरून सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे.         

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com