Vijay Hazare Trophy : गोव्याचा दोन धावांनी पराभव; हैदराबादकडून 346 धावांचे आव्हान

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

एकनाथ केरकर आणि स्नेहल कवठणकर यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना धडाकेबाज शतके नोंदवत दुसऱ्या विकेटसाठी सव्वादोनशे धावांची भागीदारी केली, त्यामुळे विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटात गोव्याला हैदराबादने दिलेल्या 346 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणे शक्य झाले

पणजी : एकनाथ केरकर आणि स्नेहल कवठणकर यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना धडाकेबाज शतके नोंदवत दुसऱ्या विकेटसाठी सव्वादोनशे धावांची भागीदारी केली, त्यामुळे विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटात गोव्याला हैदराबादने दिलेल्या 346 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणे शक्य झाले, पण झुंजार प्रयत्न थोडक्यात तोकडे पडल्यामुळे दोन धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला.

दोन्ही संघांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना रविवारी गुजरातमधील सूरत येथील सी. के. पिठावाला मैदानावर झाला. हैदराबादने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर 50 षटकांत 6 बाद 345 धावा केल्या. त्यांचा कर्णधार तन्मय अगरवाल व तिलक वर्मा यांनी दणदणीत शतके नोंदविताना 264 धावांची सलामी दिली. तन्मयने 131 चेंडूंत 19 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 150, तर तिलक याने 127 चेंडूंत नऊ चौकार व पाच षटकारांच्या मदतीने 128 धावा केल्या. हैदराबादची ही गोव्याविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली. 

आशिया चषक रद्द झाल्यास त्याला भारत जबाबदार असेल; पाकचा आरोप

नाबाद राहिलेला सलामीवीर एकनाथ केरकर याच्या 143 चेंडूंतील 19 चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 169 धावा आणि स्नेहलच्या 112 चेंडूंतील 15 चौकारांसह 116 धावांमुळे गोव्याने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 343 धावा केल्या. गोव्याला विजयासाठी शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. विश्वंबर काहलोन याने दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर अनुक्रमे चौथ्या व पाचव्या चेंडूवर एकनाथने चौकाराची नोंद केली. रक्षण याने टाकलेल्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर गोव्याला विजयासाठी चार धावांची गरज होती, पण एकच धाव मिळाल्यामुळे गोव्याला सामना दोन धावांनी गमवावा लागला. एकनाथने गोव्यातर्फे लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदविली. त्याने स्नेहलसह दुसऱ्या विकेटसाठी 225 धावांची भागीदारी केली. विजयासाठी 7.4 षटकांत 98 धावांची गरज असताना स्नेहल बाद झाला. एकनाथ व स्नेहल या दोघांनीही लिस्ट ए क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतक झळकाविले.  

गोव्याचा हा स्पर्धेतील चौथा पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे एका  विजयासह पाच लढतीतून चार गुण कायम राहिले. हैदराबादने तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे त्यांचे 12 गुण झाले. एलिट अ गटात गुजरातने सर्वाधिक 20 गुण नोंदविले. बडोद्यास 16 गुणांसह दुसरा क्रमांक मिळाला. अन्य संघांत छत्तीसगडने आठ गुण प्राप्त केले, तर त्रिपुरास पाचही लढतीत हार पत्करावी लागली.

संक्षिप्त धावफलक

हैदराबाद : 50 षटकांत 6 बाद 345 (तन्मय अगरवाल 150, तिलक वर्मा 128, हिमालय अगरवाल नाबाद 27, लक्षय गर्ग 10-2-60-2, विजेश प्रभुदेसाई 9-0-63-0, दर्शन मिसाळ 4-0-26-0, दीपराज गावकर 7-0-57-0, अमित वर्मा 5-0-36-0, सुयश प्रभुदेसाई 10-0-60-1, अमूल्य पांड्रेकर 9-0-42-0) वि. वि.

गोवा : 50 षटकांत 5 बाद 343 (एकनाथ केरकर नाबाद 169, वैभव गोवेकर 4, स्नेहल कवठणकर 116, अमित वर्मा 12, सुयश प्रभुदेसाई 10, दर्शन मिसाळ 13, विश्वंबर काहलोन नाबाद 9, टी. रवी तेजा 3-69, तनय त्यागराजन 1-67, बी. संदीप 1-63).
 

संबंधित बातम्या