भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना आज ; भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर झालेली घसरण, अशा पार्श्‍वभूमीवर जवळपास दहा महिन्यांनंतर पहिला कसोटी सामना आणि तोही प्रकाशझोतात खेळणाऱ्या भारतीय संघाला आता आपल्या कसोटी क्रिकेट अस्तित्वासाठी विद्युत प्रकाशाकडून सूर्योदयाकडे झेप घ्यावी लागणार आहे.

ॲडलेड :  कसोटी क्रिकेटमध्ये गमावलेले अव्वल स्थान, कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर झालेली घसरण, अशा पार्श्‍वभूमीवर जवळपास दहा महिन्यांनंतर पहिला कसोटी सामना आणि तोही प्रकाशझोतात खेळणाऱ्या भारतीय संघाला आता आपल्या कसोटी क्रिकेट अस्तित्वासाठी विद्युत प्रकाशाकडून सूर्योदयाकडे झेप घ्यावी लागणार आहे.

संपूर्ण क्रिकेटविश्‍वाचे लक्ष लागून राहिलेला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना आजपासून ॲडलेड ओव्हल मैदानावर सुरू होत आहे. कोरोना महामारी, त्यानंतर लॉकडाऊन अशा आव्हानात्मक परिस्थितीनंतर क्रिकेट सुरू झालेले असले तरी भारतीय संघ फेब्रुवारीनंतर प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे; तर ऑस्ट्रेलिया संघही जानेवारीनंतर पहिल्यांदा कसोटी खेळणार आहे. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर खेळणार असले तरी संघर्षाची तीव्रता कमी नसणार हे दोन्ही संघांच्या तयारीवरून दिसून येत आहे. 

अनुभव ऑस्ट्रेलियाच्या बाजूने

प्रकाशझोतात कसोटी खेळणे हे आव्हानात्मक असते. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया सर्वाधिक सात सामने खेळले आहेत, त्यातील एकही सामना गमावलेला नाही, तर भारत अवघा एक सामना खेळलेला आहे. त्यात परदेशातील हा त्यांचा पहिलाच सामना आहे. त्यामुळे अनुभव ऑस्ट्रेलियाच्या बाजूने आहे. 

पृथ्वी शॉला संधी

सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघांनी आपापले अंतिम संघ जाहीर केले. भारताने फॉर्मात आलेल्या शुभमन गिलऐवजी पृथ्वी शॉला पसंती दिली आहे. भारताने दोन्ही सराव सामन्यांत या दोघांना संधी दिली होती, परंतु प्रकाशझोतातील सराव सामन्यात गिल शॉपेक्षा अधिक आत्मविश्‍वासाने फलंदाजी करत होता. दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच सराव सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला शॉ त्यानंतर प्रथमच कसोटी सामन्यात खेळणार आहे. मयांक अगरवालबरोबर तो सलामीला खेळेल.

वृद्धिमन साहावर विश्‍वास 

भारतीय संघ व्यवस्थापनाने धडाकेबाज रिषभ पंतसाठी सुनील गावसकरसारखे खेळाडू आग्रही असले तरी संघ व्यवस्थापनाने यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमन साहावर विश्‍वास दाखवला आहे. प्रकाशझोतातील सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात पंतने वेगवान शतक केले होते.

कोहली-स्मिथ संघर्ष

कोहली लॉकडाउनपर्यंत कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी होता; परंतु पुन्हा एकदा स्टीव स्मिथने हे पहिले स्थान मिळवले आहे. क्रमवारी कोणतीही असली तरी या दोघांच्या कामगिरीवर फलंदाजीत दोन्ही संघांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. 

 

वॉर्नरच्या अनुपस्थितीचा फायदा?

दोन वर्षांपूर्वी भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती, त्यावेळी स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर संघात नव्हते, आता स्मिथ असला तरी पहिल्या कसोटीत वॉर्नर खेळणार नाही. भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियाचीही सलामी अस्थिर आहे. ज्यो बर्न्स आणि मॅथ्यू वेड हे सलावीर असतील.

असे आहेत अंतिम संघ

  • भारत : मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमन साहा, आर. अश्‍विन, उमेश यादव, जसप्रित बुमरा, महम्मद शमी
  • ऑस्ट्रेलिया : ज्यो बर्न्स, मॅथ्यू वेड, लबुशेन, स्टीव स्मिथ, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, टीम पेन, नॅथन लायन, मिशेल स्टार्क, पॅट कमिंस, जॉश हॅझलवूड.

 

लक्ष्यवेधक

  •      ॲडलेडमधील एकही कसोटी पाचव्या दिवसापर्यंत नाही
  •      गेल्या पाचही कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय, तर भारताची गेल्या दोन कसोटीत हार, पण त्यापूर्वीच्या तीन कसोटींत विजय
  •      प्रकाशझोतातील कसोटीत मिशेल स्टार्कचा स्ट्राईक रेट ३५.६, तर सरासरी १९.२३. या सात कसोटीत त्याच्या ४२ विकेट. 
  •      ऑस्ट्रेलियाची ही प्रकाशझोतातील आठवी कसोटी, तर भारताची दुसरी
  •      प्रकाशझोतातील सातही कसोटीत ऑस्ट्रेलियाची सरशी, तर एकमेव कसोटीत भारताचाही विजय

निर्णायक तीस षटके

  •      ऑस्ट्रेलियातील प्रकाशझोतातील कसोटीत पहिल्या तीस षटकांत एका विकेटमागे सरासरी २७.२५ धावा, तर त्यानंतरच्या ५० षटकांत ३०.०४
  •      धावगती पहिल्या तीस षटकांत २.७९, तर नंतरच्या ५० षटकात ३.२४
  •      पहिली तीस षटके विद्युत प्रकाशझोतात आल्यास जास्त धोकादायक (भारताने सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अ चा पहिला डाव याच कालावधीत संपवला)

 

ठिकाण : ॲडलेड ओव्हल
थेट प्रक्षेपण : सकाळी ९.३० पासून सोनी सिक्‍स, सोनी टेन वन आणि सोनी टेन थ्री.

 

खेळपट्टीचा अंदाज :  गवताळ खेळपट्टी, पण गुलाबी चेंडू असल्यामुळे फलंदाजांना फारशी धास्ती नसेल. गवत प्रामुख्याने चेंडूची चकाकीच राहण्याची शक्‍यता. गुलाबी चेंडूवरील सुरुवातीच्या तीस षटकांत गोलंदाजांचे वर्चस्व असते. त्यातच पहिल्या दिवसाचे पहिले सत्र गोलंदाजांना जास्तच साथ देणारे. संधीप्रकाशात फलंदाजी जास्तच आव्हानात्मक

हवामानाचा अंदाज :  प्रामुख्याने आल्हाददायक, पण पहिल्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी माफक पावसाची शक्‍यता. अर्थात या सरी हलक्‍याच असतील. 

 

अधिक वाचा :

आयएसएलमध्ये एफसी गोवाला हरवून एटीके मोहन बागान दुसऱ्या स्थानावर 

 

संबंधित बातम्या