ISL 2020-21: सिपोविचच्या स्वयंगोलमुळे चेन्नईयीन एफसीला पराभवाचा झटका

दैनिक गोमन्तक
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

चेन्नईयीन एफसीच्या एनेस सिपोविच याच्या स्वयंगोलमुळे जमशेदपूर एफसीला सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सामना 1 - 0 फरकाने निसटता जिंकता आला, त्याचबरोबर त्यांच्या प्ले-ऑफ फेरीच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

पणजी : चेन्नईयीन एफसीच्या एनेस सिपोविच याच्या स्वयंगोलमुळे जमशेदपूर एफसीला सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सामना 1 - 0 फरकाने निसटता जिंकता आला, त्याचबरोबर त्यांच्या प्ले-ऑफ फेरीच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

सामना बुधवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. निर्णायक गोल सामन्याच्या शेवटच्या मिनिटास झाला. जमशेदपूरचा स्पॅनिश आघाडीपटू डेव्हिड ग्रान्डे याचा फटका रोखण्याच्या प्रयत्नात चेंडू सिपोविच याला लागून चेन्नईयीन एफसीचा गोलरक्षक विशाल कैथ याला चकवा देत नेटमध्ये घुसला. जमशेदपूरचा हुकमी आघाडीपटू नेरियूस व्हाल्सकिस लढतीत खेळू शकला नाही, त्याची जागा ग्रान्डे याने संघात घेतली होती. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चेन्नईयीनने जमशेदपूरला हरविले होते, त्याचा वचपा ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने काढला.

ISL 2020-21 : तळातील ओडिशाची गाठ केरळा ब्लास्टर्सशी

जमशेदपूरचा हा 17 लढतीतील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 21 गुण झाले असून ते सहाव्या क्रमांकावर आले आहेत. एफसी गोवा, हैदराबाद एफसी व नॉर्थईस्ट युनायटेड या संघांपेक्षा त्यांचे दोन गुण कमी आहेत. साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील दोन वेळच्या विजेत्या चेन्नईयीनला सहावा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 17 लढतीनंतर त्यांचे 17 गुण आणि आठवा क्रमांक कायम राहिला. त्यांच्या प्ले-ऑफ फेरीच्या दिशेने वाटचाल खडतर बनली आहे. जमशेदपूरविरुद्ध आक्रमणातील सदोष खेळ चेन्नईयीनसाठी महागात पडला. जमशेदपूरने उत्तरार्धातील खेळात आक्रमण तेज केले.

सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले. चेन्नईयीन एफसीचे आक्रमण विरुद्ध जमशेदपूरचा भक्कम बचाव असेच चित्र पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात पाहायला मिळाले. सामन्याच्या चौथ्याच मिनिटास चेन्नईयीनने जमशेदपूरच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली होती, पण लाल्लियानझुआला छांगटे याने फटका मारला असता जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश दक्ष राहिला. त्यानंतर तिसाव्या मिनिटास चेन्नईयीनच्या रहीम अली याचा फटका जमशेदपूरचा बचावपटू रिकी लाल्लॉमॉमा याला गुंगारा देऊ शकला नाही. त्यानंतर पाच मिनिटांनी चेन्नईयीनच्या रीगन सिंगचा प्रयत्न जमशेदपूरच्या स्टीफन एझे याने उधळून लावला.

विश्रांतीनंतरच्या आठव्या मिनिटास जमशेदपूरला आघाडी घेण्याची संधी होती. ऐतॉर मॉनरॉयच्या फटक्यावर पीटर हार्टली याच्या हेडिंगला डेव्हिड ग्रांडे अचूक दिशा दाखवू शकला नाही, चेंडू गोलपट्टीवरून गेला.

दृष्टिक्षेपात...

- जमशेदपूरच्या स्पर्धेत 7 क्लीन शीट्स

- जमशेदपूरचे 16 गोल

- चेन्नईयीन सलग 6 सामने विजयाविना, 3 विजय, 3 पराभव

- चेन्नईयीनवर प्रतिस्पर्ध्यांचे 17 गोल

- पहिल्या टप्प्यात चेन्नईयीनची वास्को येथे जमशेदपूरवर 2-1 फरकाने मात
 

संबंधित बातम्या