ISL 2020-21 : ओडिशाची केरळा ब्लास्टर्सशी बरोबरी

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियोने नोंदविलेल्या दोन गोलमुळे सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ओडिशा एफसीने केरळा ब्लास्टर्सला 2 - 2 गोलबरोबरीत रोखले.

पणजी : ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियोने नोंदविलेल्या दोन गोलमुळे सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ओडिशा एफसीने केरळा ब्लास्टर्सला 2 - 2 गोलबरोबरीत रोखले. सामना गुरुवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी अमितकडे गोव्याचे नेतृत्व कायम

केरळा ब्लास्टर्ससाठी 52 व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन जॉर्डन मरे याने बरोबरीचा गोल केला, नंतर इंग्लंडच्या गॅरी हूपरने 68 व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियो याने ओडिशाला 45व्या मिनिटास आघाडीवर नेले होते, त्यानंतर त्यानेच 74 व्या मिनिटास संघाची पिछाडी भरून काढली. सामन्याच्या अंतिम टप्प्यात दोन्ही संघांनी आघाडीसाठी आटोकाट प्रयत्न केले, पण गोलरक्षक दक्ष राहिल्यामुळे गोलबरोबरी कायम राहिली.

केरळा ब्लास्टर्सचा ही 17 सामन्यातील सातवी बरोबरी ठरली. त्यांचे 16 गुण झाले असून नववा क्रमांक मिळाला आहे. ओडिशाने 16 लढतीत सहावी बरोबरी नोंदविली. नऊ गुणांसह त्यांचा शेवटचा अकरावा क्रमांक कायम राहिला.

पूर्वार्धातील शेवटच्या मिनिटास ब्राझीलियन दिएगो मॉरिसियो याने गोलशून्य बरोबरीची कोंडी भेदताना ओडिशा एफसीला आघाडी मिळवून दिली. त्याने जेरी माविहमिंगथांगा याच्या असिस्टवर मॉरिसियो याने जागा सोडून पुढे आलेला गोलरक्षक आल्बिनो गोम्स याला गुंगारा देत चेंडूला आरामात नेटची दिशा दाखविली. त्याचा हा स्पर्धेतील आठवा गोल ठरला. पूर्वार्धात संधी गमावल्यामुळे केरळा ब्लास्टर्सचे नुकसानच झाले. मॉरिसियोने स्पर्धेतील नववा गोल नोंदवत ओडिशाला पिछाडीनंतर बरोबरी साधून दिली.

पूर्वार्धात गमावलेल्या संधीची भरपाई केरळा ब्लास्टर्सने उत्तरार्धाच्या सुरवातीसच केली. गॅरी हूपर व जॉर्डन मरे या आक्रमणातील जोडगोळीने ओडिशाच्या बचावफळीवर दबाव टाकत संघाला बरोबरी साधून दिली. गोलचे जास्त श्रेय हूपर याला जाते. जेकब ट्रॅट याने रचलेल्या चालीवर हूपरने चेंडूवर ताबा राखत ओडिशाच्या बचावफळीतील चुकीचा लाभ घेत मरेच्या दिशेने चेंडू सुरेखपणे क्रॉसपास केला. यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूने स्पर्धेतील वैयक्तिक सातवा गोल केला. त्यानंतर हूपरने स्वतः गोल नोंदवत केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली. इंग्लिश आघाडीपटूने सहल अब्दुल समद याच्या असिस्टवर गोलरक्षक अर्शदीप सिंगला सहजपणे चकविले.

दृष्टिक्षेपात...

- ओडिशाच्या दिएगो मॉरिसियोचे 16 सामन्यात 9 गोल

- केरळा ब्लास्टर्सच्या जॉर्डन मरे याचे 16 लढतीत 7 गोल

- केरळा ब्लास्टर्सच्या गॅरी हूपर याचे 15 लढतीत 4 गोल

- प्रतिस्पर्ध्यांचे केरळा ब्लास्टर्सवर 29, तर ओडिशावर 27 गोल

- केरळा ब्लास्टर्सचे 22, तर ओडिशाचे 16 गोल

- पहिल्या टप्प्यात ओडिशाची केरळा ब्लास्टर्सवर 4-2 फरकाने मात
 

संबंधित बातम्या