सय्यद मुश्ताक अली करंडक टी20: आदित्यमुळे गोवा विजयपथावर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

कर्णधार अमितचेही उपयुक्त योगदान; सेनादलावर पाच विकेटनी मात

पणजी : सलामीवीर आदित्य कौशिकचे खणखणीत अर्धशतक आणि त्याने कर्णधार अमित वर्मा याच्यासमवेत केलेली महत्त्वपूर्ण भागीदारी या बळावर गोव्याने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटात बुधवारी चमकदार विजय नोंदविला. त्यांनी सेनादलास पाच विकेट राखून हरविले.

सामना इंदूर-मध्य प्रदेशमधील येथील एमेराल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूल मैदानावर झाला. गोव्यासमोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य होते. गोव्याचा डावखुरा फलंदाज दर्शन मिसाळ याने विजयी षटकार खेचला तेव्हा डावातील दोन चेंडू बाकी होते. गोव्याने 19.4 षटकांत 5 बाद 163 धावा केल्या. मध्य प्रदेशविरुद्ध सहा धावांनी पराजित झालेल्या गोव्याचा हा पहिला विजय ठरला, तर सेनादलास सलग दुसरा हार पत्करावी लागली.

जमशेदपूरच्या आव्हानास गोवा सज्ज

आदित्यने 56 चेंडूंत पाच चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. त्याने कर्णधार अमितसह (42) तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. विजयासाठी 16 चेंडूंत 19 धावा हव्या असताना अमित बाद झाला. 12 चेंडूंत 14 धावा हव्या असताना आदित्यची एकाग्रता भंग झाली. पाच चेंडूंनंतर सुयश प्रभुदेसाईही बाद झाल्याने गोव्याचा किंचित दबावाखाली आला. शेवटच्या षटकात त्यांना विजयासाठी सात धावांची गरज होती. मात्र दर्शनने काम चोख बजावत गोव्याला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

सेनादल : 20 षटकांत 7 बाद 160 (रवी चौहान 62- 53 चेंडू, 9 चौकार, राहुलसिंग गहलोत 37- 27 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, रजत पलिवाल 27, विकास हाथवाला 13, अशोक डिंडा 4-0-44-1, लक्षय गर्ग 4-0-25-2, दर्शन मिसाळ 4-0-28-1, दीपराज गावकर 3-0-23-0, मलिक सिरूर 3-0-17-1, सुयश प्रभुदेसाई 1-0-7-0, अमित वर्मा 1-0-13-0)

पराभूत वि. गोवा : 19.4 षटकांत 5 बाद 163 (अमोघ देसाई 5, आदित्य कौशिक 78- 56 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, स्नेहल कवठणकर 19, अमित वर्मा 42- 27 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, दर्शन मिसाळ नाबाद 14, सुयश प्रभुदेसाई 1, एकनाथ केरकर नाबाद 1, वरुण चौधरी 1-28, मोहित कुमार 3-32, व्ही. यादव 1-34).

संबंधित बातम्या