विकासापासून कोसो दूर हुतात्म्यांची भूमी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

हुतात्म्यांची भूमी आजही आहे उपेक्षित

कुंकळ्ळीचा विकास रखडला, अनेक प्रकल्प अपूर्ण, विकासाची प्रतीक्षा

स्वातंत्र्यवीरांची भूमी म्हणून गणना होत असलेली भूमी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून व सरकारकडून विकासाची प्रतीक्षा करीत असून विकासाच्या बाबतीत उपेक्षित असलेली भूमी सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी धडपडत आहे.

कुंकळ्ळी : ज्या कुंकळ्ळीकरांनी १५८३ च्या लढ्यात शौर्याचा इतिहास रचला, ज्या कुंकळ्ळीकरांनी गोवा मुक्ती संग्रामात रक्त सांडले, ज्या कुंकळ्ळीकरांनी आपल्या भूमीसाठी आहुती दिली, ती कुंकळ्ळीची वीरभूमी आजही विकासाच्या बाबतीत मागासलेलीच असून केवळ नावासाठी नगर अन्यथा गाव अशी या भूमीची स्थिती आहे. ज्या गतीने कुंकळ्ळीचा विकास होणे अपेक्षित होते, ज्या नियोजनाप्रमाणे विकास होणे गरजेचे होते तसा विकास कुंकळ्ळीने पाहिला नाही, अशी खंत व तक्रार कुंकळ्ळीवासींय करताना दिसतात.

स्थानिक व येथील बिगर सरकारी संस्थाही शांत व गप्प बसल्यामुळे सरकारवर दबाव टाकू न शकल्याने कुंकळ्ळी विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला, अशी भावना लोकांत झाली आहे. नागरिक आपल्या हक्कासाठी आजही तळमळत आहेत.ज्योकिम आलेमाव यांच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे झाली या विकासकामांना नियोजनाचा अभाव असल्याची टीकाही झाली. आलेमाव यांनी कुंकळ्ळी पालिकेच्या बाराही प्रभागात प्रत्येकी एक लहान सभागृह उभारून देण्यात आले. या शिवाय कुंकळ्ळी भव्य सभागृह उभारण्यात आले.

कुंकळ्ळी बाजार प्रकल्प, आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुंकळ्ळी बसस्थानक, स्वातंत्र्यसैनिक पार्क, चिफ्टनं मेमोरियल पार्क, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत कचरा गोळा करणे व प्रक्रिया करणारी यंत्रणा बसविण्यात आली. लाखो रुपये खर्चून कुंकळ्ळीत नक्षीदार पथदीप बसवण्यात आले. लाखो रुपये खर्चून कुंकळ्ळीत पाच ठिकाणी हायमास्ट वीज दिवे बसविले. मात्र, या सर्व प्रकल्पाची जी स्थिती पाहिल्यास हा निधी पाण्यात गेल्याची शंका व्यक्त करण्यात येते. कुंकळ्ळी बस स्थानक म्हणा किंवा बाजार प्रकल्प म्हणा, कुंकळ्ळीतील सभागृह म्हणा किंवा चिफ्टनं पार्क म्हणा हे सर्व प्रकल्प आज अडगळीत पडले असून या प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. योग्य निगा न राखल्यामुळे सरकारी खर्चाने उभारलेले हे प्रकल्प आज उद्‍गाराच्या प्रतीक्षेत आहेत.

कुंकळ्ळी जुन्या मासळी बाजार इमारतीच्या छतावर झाडे उगवली असून ही इमारत भूत बंगला बनलेली आहे. खासदार निधीतून काकना मोडी येथे उभारलेले भव्य सभागृह भूत बंगला बनले आहे. सरकारचे करोडो रुपयांची नासाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
कुंकळ्ळीची शान असलेले व कुंकळ्ळीच्या प्रथम लढ्याच्या स्मरणार्थ उभारलेले हुतात्मा स्मारक आजही अपूर्ण असून हे कीर्ती स्थान पालिकेने डपिंग स्थान बनवून थोर ऐतिहासिक स्थळाचा अवमान केलेला आहे. हुतात्मा स्मारकात गैरव्यवहार चालत असून त्या पवित्र ऐतिहासिक स्थानाचे पावित्र्य राखावयास पालिकेला अपयश आलेले आहे.

कुंकळ्ळी पालिका इमारतीच्या नाकाखाली असलेल्या प्रकल्पाची निगा राखण्यास पालिकेला अपयश आले आहे हीच, स्थिती कुंकळ्ळी स्वातंत्र्यसैनिक उद्यानाची झाली आहे. कुंकळ्ळीतील स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मरणार्थ उभारलेले उद्यान आज उद्धाराची प्रतीक्षा करीत आहे.
कुंकळ्ळी नगरपालिका मंडळाला या प्रकल्पाची निगा राखण्यास अपयश आले असूनकुंकळ्ळी पालिकेची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे पालिका प्रकल्पाच्या सुरस्तीचे काम हाती घेण्यात कचरते. कुंकळ्ळीत जिसुडाच्या सहयोगाने भव्य व्यावसायिक इमारत उभारलेली आहे, मात्र निधीची कमतरता भासत असल्यामुळे या प्रकल्पाचे उद्‍घाटन रेंगाळले आहे कुंकळ्ळी पालिकेला म्हणे जमा खर्च सांभाळताना कसरत करावी लागते.कुंकळ्ळीपालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे पालिकेचा ऎशी टक्के निधी कामगार व कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी खर्च होतात.

स्थानिक आमदार क्लाफास डायस मात्र या बाबतीत आशावादी असून कुंकळ्ळीचा विकास झपाट्याने होणार व पूर्व समस्यांवर तोडगा काढण्यात येणार असा विश्वास त्यांना आहे कुंकळ्ळीत सुमार तीस वर्षांपूर्वी स्थापन केलेली कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत लोकांसाठी मोठी डोकेदुखी बनलेली आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त जगालेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची देन असलेल्या कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमुळे येथील भूमी, हवा व पाणी पूर्णपणे नष्ट झाले आहेत.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमुळे केवळ प्रदूषणच नव्हे तर सामाजिक प्रदूषणाचा फटकाही नागरिकांना सोसावा लागत आहे.या प्रदूषणकारी औद्योगिक वसाहतीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झालेले आहे. प्रदूषणकारी धातू निर्माण करणारे कारखाने व मासळी प्रकल्पामुळे कुंकळ्ळीची पार दुर्दशा झालेली आहे.

फळ विक्रेत्यांच्या दुकानांना आग

कुंकळ्ळी शैक्षणिक हब बनणार का?
कुंकळ्ळीला शैक्षणिक हब करण्याचा दावा पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री मनोगत पर्रीकर यांनी केला होता.विद्यमाम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही कुंकळ्ळीला शैक्षणिक हब बनविण्याचा दावा केला आहे.सरकारने कुंकळ्ळीत एनआयटी स्थापन करण्यासाठी साडे चार लाख चौरस मीटर जागा संपादन केली आहे.केंद्र सरकारने एनआयटी स्थापन्यासाठी ५०० कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. एका बाजूने यनआयटी कॉम्प्लेक्समुळे पंच तारांकित सुविधा घेऊन शिकणार तर दुसऱ्या बाजूने कुंकळ्ळीतील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मूलभूत गरजा मिळत नाहीत.
कुंकळ्ळीत बारा प्राथमिक विद्यालये, पाच माध्यमिक विद्यालय, दोन उच्च माध्यमिक विद्यालये व एक महाविद्यालय आहे, असे असले तरी या शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत गरजाही प्राप्त होत नाहीत. शाळांना योग्य मैदान नाही, योग्य सभागृह नाही व योग्य वातावरण नाही. शिक्षण संस्थाना शिक्षणाच्या विस्तारासाठी जागेची कमतरता भेडसावत आहे.

कुंकळ्ळीत उभी राबत असलेल्या एनआयटीसाठी विद्यार्थी तयार करण्यासाठी तसे दर्जेदार विद्यार्थी तयार करण्यासाठी सरकारच्या सहकाऱ्याची गरज आहे. पाझोरकोनी येथे सरकारच्या मालकीच्या जमीन आहे. या जमिनीवर शाळा विस्तार करणे शक्य आहे. सरकारने कुजीरा धरतीवर येथील शिक्षण संस्था हालविण्यात सहकार्य करावे, अशी मागणी कुंकळ्ळी शिक्षण संस्थेने केली आहे सरकारने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कुंकळ्ळीच्या विकासासाठी हात द्यावा, ज्या समस्यांमुळे जनता वैतागलेली आहे त्या धसास लावाव्यात, अशी मागणी कुंकळ्ळीकर करीत आहेत.

शहराचा दर्जा असूनही उपयोग नाही
स्थानिक स्वराज्य संस्थेची निष्क्रियता व लोकप्रतिनिधीची अकार्यक्षमता यांच्यामुळे कुंकळ्ळीनगर असूनही नगरासारखा विकास झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. मुक्तीलढ्यात आघाडीवर असलेल्या कुंकळ्ळीला ३५ वर्षां पूर्वीनगराचा दर्जा मिळाला. स्थानिक म्हणतात, पोर्तुगीजाशी लढा दिला म्हणून पोर्तुगीजांनी उपेक्षित ठेवले. मुक्तीनंतर विकास होणार अशी भाबडी आशा लोकांना होती. मात्र, गोवा मुक्तीनंतर २००० सालापर्यंतच्या सर्व सरकारंनी कुंकळ्ळीला अंधारातच ठेवले. २००० सालापर्यंत निवडलेले सर्व आमदार विकास आणण्यात कमी पडले, ही वस्तुस्थिती असून २००० नंतर ज्योकिम आलेमाव सरकारात मंत्री बनल्यावर कुंकळ्ळीचा झपाट्याने विकास झाला हे सत्य आहे.

संबंधित बातम्या